शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्या अशा सूचना आमदार चौगुले यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली लोहारा पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी (दि.१६) दुपारी साडे तीन वाजता खरीप पीक कर्ज वाटप आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आ. चौगुले बोलत होते. या बैठकीसाठी तहसीलदार संतोष रुईकर, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील बहुतांश बँकेच्या शाखांचे मॅनेजर / कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी खरीप पीक कर्ज वाटपाची सद्यस्थिती सांगितली. दरम्यान बँकांना पीक कर्ज वाटपाचे किती उद्दिष्ट दिले आहे, त्यापैकी किती टक्के कर्ज वाटप झाले आहे याबाबत आमदार चौगुले यांनी आढावा घेतला.
यावेळी आ. चौगुले म्हणाले की, तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी तात्काळ कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आपल्याकडील बँकांत कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा लोढ आहे. तरीही शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात अडचण येऊ देऊ नका. तसेच ऊस पिकासाठी कारखान्याचे हमीपत्र आणण्याची अट टाकू नका अशा सूचना यावेळी आ. चौगुले यांनी उपस्थित बँक अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कर्ज प्रस्तावास काय कागदपत्रे लागतात याची यादी शाखेत दर्शनीय भागात लावलेली आहे का असा प्रश्न उपस्थित केला. या बैठकीसाठी उपनगराध्यक्ष आयुब शेख, अभिमान खराडे, अमीन सुंबेकर, श्रीकांत भरारे, दिपक रोडगे, राजेंद्र माळी, अविनाश माळी, प्रमोद बंगले, आयुब शेख, सुरेश दंडगुले, महादेव धारुळे, बँक अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.