वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
भारताचे माजी पंतप्रधान, इंटरनेट क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीव गांधी यांचा जन्मदिवस ‘सामाजिक सद्भावना दिवस म्हणून साजरा करावा तसेच त्यानंतचे १५ दिवस ‘सामाजिक ऐक्य पंधरवडा’ म्हणून साजरा करावा असे केंद्र सरकारचे आदेश आहेत.
‘सामाजिक ऐक्य पंधरवडा’ अंतर्गत लोहारा येथील वसंतदादा पाटील हायस्कूल व नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने गुरुवारी (दि.२५) सामाजिक कार्यकर्ते, लेखक व व्याख्याते ॲड. शीतल चव्हाण यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
ॲड. शीतल चव्हाण यांनी प्राचीन काळापासूनची भारतातील वैचारिक विविधता तद्नंतर भारतात आलेले अनेक धर्माच्या व पंथाच्या लोकांचे इथल्या मातीशी एकरुप होण्याची प्रक्रिया यासह भारतातील गंगाजमणी तहजीब सांगितली. भारताच्या इतिहासातील अनेक दाखले, महापुरुषांचे विचार व संविधानाची मुलतत्वे सांगून त्यांनी समाजातील विविधता टिकवण्याचे व विषमता संपवण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी प्राचार्या उर्मिला पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख सचिन शिंदे, ॲड. शितल चव्हाण फाऊंडेशनचे उपाध्यक्ष राजू भालेराव, सदस्य विजय चितली यांच्यासह संस्थेचे सर्व शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर संस्थेच्या वतीने ॲड. शीतल चव्हाण राबवत असलेल्या वाचन चळवळीकरीता त्यांना पुस्तके भेट देण्यात आली.