वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील दि प्राईड इंडिया स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या चार अद्ययावत मोबाईल मेडिकल युनिटच्या माध्यमातून १२६ गावामध्ये “मिशन कवच कुंडल अभियान” सुरु करण्यात आले आहे. या अभियाना अंतर्गत कोव्हीड लसीकरणा संबधी जनजागृती आणि लसीकरण करण्यात येत आहे. या माध्यमातून गावातील पात्र नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे असे प्रतिपादन स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले. स्पर्शचे कार्यक्रम अधिकारी अच्युत आदटराव म्हणाले कि, चार मोबाईल मेडिकल युनिटच्या माध्यमातून लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील गरजू १२६ गावामध्ये ठरलेल्या तारखेला आणि ठरलेल्या वेळेत आरोग्य सेवा सातत्याने देण्यात येते. तसेच “मिशन कवच कुंडल” अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी १२६ गावामध्ये मोबाईल मेडिकल युनिटच्या नियोजित दौऱ्याच्या एक दिवस अगोदर चित्ररथाच्या माध्यमातून लसीकरणासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. तर दुसऱ्या दिवशी कोव्हीड लसीकरण आयोजित करण्यात येत आहे.चारही मोबाईल मेडिकल युनिटवर कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लसीचे डोस उपलब्ध करण्यात आलेले आहेत. वाडी,वस्ती व दुर्गम भागातील लोकांना गावातच डोस उपलब्ध झाल्याने व सुविधा निर्माण झाल्याने नागरिकामधून कौतुक होत आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लसीचे एकूण २७४५ डोस देण्यात आले अशी माहिती स्पर्श रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यासाठी सर्व ग्रामपंचायत, आशा कार्यकर्ती आणि मोबाईल मेडिकल युनिटचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.