लोहारा तालुक्यातील सास्तुर, होळी परिसरात बुधवारी (दि. ५) दुपारी चार वाजून ३२ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. लातूर येथील भूकंपमापक केंद्रात या भूकंपाची नोंद झाली असून १.८ रिस्टर स्केलचा हा भूकंप होता.
लोहारा तालुक्यातील सास्तुर, होळी परिसरात बुधवारी दुपारी चार वाजून ३२ मिनिटाच्या सुमारास भूकंप झाला. या भूकंपामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दरम्यान घरावरील पत्रे हादरल्याचे काही नागरिकांनी सांगितले. १९९३ साली सास्तुर परिसरात महाप्रलंयकारी भूकंप झाला होता. यात हजारो नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाला २९ वर्षे झाली. भूकंप म्हणले तरी या परिसरातील नागरिकांच्या अंगावर काटा येतो. आत्ता कुठे नागरिक त्या कटू आठवणींना विसरून जीवन जगत असताना पुन्हा एकदा या भूकंपामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत लातूर येथील भूकंपमापक केंद्रातील अधिकारी परदेशी यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता भूकंपमापन केंद्रात याबाबत नोंद झाली असून हा भूकंप १.८ रिस्टर स्केलचा असल्याचे त्यांनी सांगितले.