वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व जागरूक पालक, सुदृढ बालक अभियानाची सुरुवात दि. ९ फेब्रुवारी २०२३ पासून होत आहे.
लोहारा तालुक्यातील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात या अभियानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या निर्देशाप्रमाणे दि.९ फेब्रुवारी रोजी महाआरोग्य शिबीर व महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या महा आरोग्य शिबिरात विविध आजाराचे तज्ञ डॉक्टर रुग्णाची तपासणी करणार आहेत. यात फिजिशियन, हृद्य रोग, छाती आजार तज्ञ सर्जन, बालरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, इ. तज्ञ रुग्णांची तपासणी करणार आहेत. यामध्ये मधुमेह व रक्तदाबामुळे निर्माण झालेले डोळ्याचे आजार, काच बिंदू, मोतीबिंदू व इतर डोळ्याचे आजार याची तपासणी तसेच मागील तीन महिन्यातील रक्तातील साखरेची HBA1C तपासणी, ताणतणाव व्यवस्थापन संबधी तपासणी तसेच कर्करोग, कुष्ठरोग व इतर विविध आजाराची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आबाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे व ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तुरचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले आहे.