वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
स्पर्श ग्रामीण रुग्णालया मार्फत दिली जाणारी आरोग्य सेवा, आयोजित केली जाणारी आरोग्य शिबिरे ही कौटुंबिक सोहळ्याप्रमाणे आत्मीयतेची, उत्साहाची व परिपूर्ण असतात. जे काही करू ते नेटके, नाविन्यपूर्ण, दर्जेदार झाले पाहिजे. आपल्यामुळे रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू फुलले पाहिजे हा मानवतावादी दृष्टीकोन जपणाऱ्या स्पर्शच्या आरोग्य सेवातील सातत्यपूर्ण योगदानाचे कौतुक वाटते असे गौरवोद्गार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के.पाटील यांनी केले.
तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात डॉ. जॉय पाटणकर स्मृती प्रीत्यर्थ रोटरी क्लब कॉव्हेंट्री लंडन, अंबरनाथ, देवनार, सरस्वती प्रतिष्ठान मुंबई, प्रशांतराव परिचारक फाउंडेशन पंढरपूर, निवासी दिव्यांग शाळा सास्तूर व स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूरच्या वतीने तीन दिवसीय मोफत दिव्यांग शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२३) संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. के. पाटील, डॉ. मयुरेश वारके, डॉ. प्रमोद काळे मुंबई, जि. प. सदस्या शीतल पाटील, जिल्हा रुग्णालय उस्मानाबादचे अस्थी रोग तज्ञ डॉ. गणेश पाटील, फिजियोथेरपिस्ट डॉ. मंगेश कुलकर्णी, सरपंच यशवंत कासार यांची प्रमुख उपस्थिती होती. रोटरी क्लबच्या या शिबिरासाठीच्या योगदानाबद्दल रोटरी क्लब कॉव्हेंट्री लंडन, अंबरनाथ, देवनार यांची प्रशंसा केली. तसेच ग्रामीण रुग्णालय स्पर्शला चांगली दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन डॉ. पाटील यांनी यावेळी बोलताना दिले. ग्रामीण रुग्णालय सास्तूरच्या सातत्यपूर्ण कामामुळे व मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया होत असल्यामुळे येथील शस्त्रक्रियागार हे अत्याधुनिक करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले. ते म्हणाले की, अपंगत्व निवारण शस्त्रक्रिया शिबिराचे हे तेरावे वर्ष आहे. आता पर्यंत जवळपास १२०० च्या वर दिव्यांग बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ही बालके आज आपल्या स्वतच्या पायावर उभी आहेत, चालत आहेत, धावत आहेत. हे सर्व पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हास्य पाहून आत्मिक समाधान मिळते. याचे सर्व श्रेय या मानवतावादी सेवा देणाऱ्या देवदुतांना (रोटरी क्लबच्या डोक्टरांच्या) जाते. निस्वार्थपणे गेली १२ वर्ष डॉ. जॉन क्लेग, डॉ. मयुरेश वारके, डॉ प्रमोद काळे, डॉ. हिमांशू बेदरे व त्यांचे सहकारी करत आहेत. त्यांचे या कार्यामुळे आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन जोशी यांनी केले.
आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य प्रशासनाचे स्पर्शला नेहमीच भरघोस सहकार्य लाभते. उपसंचालक आरोग्य सेवा लातूर तसेच जिल्हा शल्यचिकित्सक उस्मानाबाद यांच्या प्रोत्साहानामुळे सर्व आरोग्याच्या निर्देशंकामध्ये स्पर्श ग्रामीण रुग्णालयाने भरीव कामगिरी केली आहे. मुंबई येथील सुप्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. प्रमोद काळे यांनी या दिव्यांग शिबिरासंबधी तसेच आपल्या बालकांच्या शस्त्रक्रिये नंतर घावयाची काळजी याबद्द्ल माहिती दिली. ० ते १४ वयोगटातील दिव्यांग बालकांच्या टेन्डन लेधनिंग, सीटीईव्ही व इतर प्रकारच्या शस्त्रक्रिया या तीन दिवसात केल्या जातील. तसेच या भागातील शेवटचे बालक संपेपर्यंत या शस्त्रक्रिया शिबिरासाठी आम्ही येत राहू असे उद्गार त्यांनी काढले.
माजी जि. प. सदस्या शीतल पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ग्रामीण रुग्णालय स्पर्शमुळे या भागातील आरोग्य सेवेला बळकटी प्राप्त झाली आहे. गोरगरिबाना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत आहे. मोठ मोठ्या शस्त्रक्रिया स्पर्श मार्फत मोफत केल्या जात असल्याबद्दल या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मला आभिमान वाटतो असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
निवासी दिव्यांग शाळा सास्तुरचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांनी या शिबिर विषयी माहिती देऊन रोटरी क्लब व स्पर्श ग्रामीण रुग्णालय हे देवदूता सारखे काम करते असे सांगून परिसरातील सर्व दिव्यांग शाळातील गरजू बालकापर्यंत शिबिराविषयी माहिती पोहोच केली आहे. दि. २३ ते २५ या दरम्यान हे शस्त्रक्रिया शिबीर होणार आहे. उस्मानाबादसह लातूर, नांदेड, बीड, सोलापूर, गुलबर्गा व बिदर या जिल्ह्यातून दिव्यांग बालके या शिबिरासाठी आली आहेत. शुक्रवारी पहिल्याच दिवशी २१० बालकांची नोदणी झाली असून त्यांची तपासणी करून यातील बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. दि. २४ रोजी आणखीन गरजू बालके येणार असून त्यांचीही तपासणी व शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्त्रक्रिया सुरूच राहणार आहेत. तरी परिसरातील व शेजारी जिल्यातील जास्तीत जास्त बालकानी या दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालय स्पर्शचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी व निवासी अपंग शाळा सास्तुरचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांनी केले आहे. यावेळी रमाकांत जोशी, बालाजी नादरगे, डॉ. मनीष सिन्हा, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक मस्के, डॉ. अतिफ पटेल, चंदन नंदी, माजी सरपंच विजयकुमार क्षीरसागर यांच्यासह स्पर्श व निवासी अपंग शाळा सास्तुरचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा पवार यांनी तर डॉ. अशोक मस्के यांनी आभार मानले.