वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
स्पर्श ग्रामीण रुग्ण्यालयाच्या चौथ्या फिरत्या वैद्यकीय आरोग्य पथकामुळे ( मोबाईल मेडीकल युनिट ) उस्मानाबाद जिल्ह्याच्या आरोग्याला बळकटी प्राप्त झाली आहे असे उदगार उमरगा –लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले यांनी काढले आहे.
आदित्य बिर्ला कॅपिटलच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या फिरत्या मोबाईल मेडीकल युनिटच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. लातूर परिमंडळचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. एकनाथ माले व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते या फिरत्या मोबाईल मेडीकल युनिटचा फीत कापून व हिरवा झेंडा दाखवून सोमवारी (दि.१९) शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार ज्ञानराज चौगुले, डॉ. एकनाथ माले उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ, युवा नेते किरण गायकवाड, उमरगा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, उमरगा तालुका शिवसेना प्रमुख बाबुराव शहापुरे, स्पर्शचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी , कार्यक्रम अधिकारी अच्युत आदटराव , डॉ. मीरा देशपांडे , डॉ. अशोक मस्के, डॉ. दीपिका चिंचोळी, डॉ. वैशाली जाधव, डॉ. युवराज हक्के , डॉ. प्रशांत जाधव उपस्थीत होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमाकांत जोशी यांनी केले. ते म्हणाले कि, ग्रामीण भागातील तसेच दुर्गम अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा पोचविण्यासाठी येणाऱ्या अडचणी तसेच गावकर्यांना आर्थिकदृष्ट्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन प्राईड इंडीया स्पर्श मार्फत उस्मानाबाद जिल्यात ३ फिरत्या मोबाईल मेडीकल युनिट मार्फत आरोग्य सेवा पोचवण्यात येत होती. आदित्य बिर्ला कॅपिटलच्या सहकार्याने आज चौथ्या मोबाईल मेडीकल युनिटचा शुभारंभ होत आहे. या चार फिरत्या मोबाईल मेडीकल युनिट मार्फत उस्मानाबाद लातूर जिल्यातील १२४ दुर्गम व अतिदुर्गम गावात आरोग्य तपासणी बरोबरच औषधी , लसीकरण, गरोदरमाता तपासणी व उपचार, जेष्ठ नागरिक तपासणी व उपचार (प्रस्तुतीपूर्व व प्रस्तुती पश्चीत सेवा ) रक्त लघवी तपासणी इसीजी इ. सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत.
यावेळी बोलताना डॉ. एकनाथ माले म्हणाले कि, स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुरच्या नियोजनबद्ध व दर्जेदार आरोग्य सेवेमुळे स्पर्शच्या आरोग्य सेवेचा सास्तूर पॅटर्न संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाला आहे. कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण रुग्ण्यालय सास्तूर (स्पर्श) ने जी आपुलकीची दर्जेदार आरोग्य सेवा दिली त्याबद्दल संपूर्ण राज्यात आरोग्य सेवेच्या सास्तूर पॅटर्न चे कौतुक होत आहे. ४ फिरत्या मोबाईल मेडीकल युनिट मार्फत ग्रामीण जनतेचे आयुर्मान उंचावण्यास मदत होणार आहे. उस्मानाबाद –लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वंचित व अर्धवंचित जनतेला प्राथमिक , प्रतिबंधात्मक, उपचारात्मक निदनात्मक व संदर्भसेवा या फिरत्या मोबाईल मेडीकल युनिट मार्फत दिली जाणार आहे त्यामुळे ग्रामीण जनतेचे आरोग्य आणखी सुदूढ करण्यास मदत होणार आहे. याचा जनतेने लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आरोग्य सेवेचा सास्तूर पॅटर्न आणखी बळकट करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सास्तुरला २०० बेडची मंजुरी देण्याचा प्रस्ताव सादर करणार असल्याचे तसेच या ठिकाणी नेत्र रुग्णालय सुरु करून नेत्र शस्त्रक्रिया सास्तूर येथे करण्यात येतील यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याचे डॉ. एकनाथ माले यांनी सांगितले. अशा प्रस्तावाचा मंत्रिमंडळ बैठकीत, अधिवेशनात सतत पाठपुरावा करून मंजुरी आणू असे आश्वासन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून रमाकांत जोशी यांनी आभार मानले.