वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मातंग समाज लहुजी शक्ती आयोजित साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे उद्घाटन शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. सुषमा अंधारे यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी दि. ८ जानेवारी ला लोहारा तालुक्यातील होळी येथे हे साहित्य संमेलन होणार आहे.
ग्रामीण भागातील युवक, युवती व नागरिकांना अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्याची माहिती मिळावी, त्यावर चर्चा घडावी, यासाठी उमरगा-लोहारा मातंग समाज लहुजी शक्तीच्या वतीने प्रथमच लोहारा तालुक्यातील होळी येथे दि. ८ जानेवारीला एक दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. होळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर एक दिवसीय साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, विविध विषयावर चार परिसंवाद, खुले काव्य संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून संविधान बचाव परिषदचे अध्यक्ष अशोकराजे सरवदे राहणार आहेत. अण्णाभाऊंच्या साहित्यातील परिवर्तनवादी विचार या विषयावर परिसंवाद होणार आहे. अॅड. शीतल चव्हाण प्रमुख वक्ते राहणार आहेत. यात कॉम्रेड प्रा. किरण सगर, सतीश कसबे, प्रा. रमेश पात्रे सहभागी होणार आहेत. थोर मानवतावादी लेखक अणाभाऊ या परिसंवादाचे प्रमुख वक्ते प्रा. प्रभाकर लोंढे तर दिलीप गायकवाड, डॉ. प्रेमचंद गायकवाड सहभाग घेतील. शिवशाहीर अण्णाभाऊ या विषयावरील परिसंवादाच्या प्रमुख वक्त्या रंजना हासुरे राहणार असून जोशीला लोमटे, सरोजा बिराजदार, दैवता सरवदे या परिसंवादात सहभागी होणार आहेत. तर अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कोमल साळुंके राहणार असून सरोजा बिराजदार, रेखा बाळासुरे, बबिता मडुळे, नूतन कांबळे या सहभागी होणार आहेत. त्यानंतर साहित्यिक, कवी बालाजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली खुले काव्य संमेलन होणार आहे. यावेळी निमंत्रित कवी नितीन चंदनशिवे, विक्रम प्राठक, गोविंद जाधव, हर्षवर्धन जाधव, विजय कांबळे उपस्थित राहून कविता सादर करणार आहेत. सायंकाळी गुणवंताच्या सन्मानानंतर सास्कृतिक कार्यक्रमाने संमेलनाचा समारोप होणार आहे. संमेलनास साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.