वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. १३ पैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने १२ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे.
ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. राज्यातील माहे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रापंचायती तसेच नव्याने स्थापीत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार लोहारा तालुक्यातील सास्तुर, जेवळी (उ), माकणी, नागुर, वडगाव गांजा, विलासपुर पांढरी, माळेगाव, उंडरगाव, तोरंबा, सालेगाव, हिप्परगा रवा, वडगाववाडी, अचलेर या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. परंतु उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी वडगावगांजा ग्रामपंचायत बिनविरोध निघाली. त्यामुळे आता तालुक्यातील १२ ग्रामपंचायतिच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.
या १२ ग्रामपंचायती मधील ३५७४८ मतदार गावचे कारभारी निवडून देणार आहेत. या सर्व ठिकाणी प्रचार शिगेला पोहोचला आहे. आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी गावपुढाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या रणनीत्या आखल्या जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच मर्यादित मतदारसंख्या असल्याने प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला जात आहे. तसेच बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांशी संपर्क साधला जात आहे. आपल्या पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोशल मीडियावरही पोस्टचा पाऊस पडत आहे. आपलेच उमेदवार कशा प्रकारे योग्य आहेत हे सांगण्याचाही प्रयत्न होत आहे. परंतु मतदार त्यांचे अमूल्य मत कोणाच्या पारड्यात टाकणार व कोण विजयी होणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
या बारा ग्रामपंचायत करिता रविवारी (दि. १८) मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक विभागाने तयारी केली आहे. यासाठी ४७ मतदान केंद्र राहणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व तीन केंद्र अधिकारी राहणार असून एक पोलीस कर्मचारी व शिपाई राहणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. ६ व १२ डिसेंबर ला मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. तहसीलदार संतोष रुईकर, विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, सुभाष चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. शनिवारी दि. १७ रोजीही प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षणानंतर मतदान यंत्रे व कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर जातील अशी माहिती लोहारा तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाने दिली आहे.
————
एकूण ग्रामपंचायती – १३
एकूण सरपंच – १३ एकूण सदस्य – १३३
बिनविरोध सरपंच – १ बिनविरोध सदस्य – २३
निवडणूक – १२ निवडणूक – ११०
उमेदवार – ३५ उमेदवार – २६१