वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील उदतपुर येथील इंद्रायणी दादासाहेब पाटील (९५ वर्षे) यांचे काही दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले. काही वर्षांपूर्वी त्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून त्याची रीतसर प्रक्रिया केली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा तो संकल्प पूर्ण केला आहे. मृत्यूनंतर देहदान करून त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
लोहारा तालुक्यातील उदतपूर येथील माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते माधवराव पाटील यांच्या मातोश्री इंद्रायणी पाटील यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. माधवराव पाटील हे चळवळीतील कार्यकर्ते. शेती, शिक्षण यासह विवाहात होणारा अनाठायी खर्च यावर ते नेहमी मार्गदर्शन करत असतात. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः त्यांच्या मुलांची विवाह नोंदणी पद्धतीने करून आदर्श निर्माण केला आहे. या पद्धतीचे निर्णय घेताना नातेवाईक, समाजातील अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. तरीही त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. परंतु अशाप्रकारचे निर्णय घेताना ते त्यांच्या आई इंद्रायणी पाटील यांना विचारत असत. त्यावेळी त्यांच्या आईकडून ही त्यांच्या या निर्णयाला पाठींबा मिळत होता असे माधवराव पाटील यांनी सांगितले.
मानवी शरीर हे नाशवंत आहे. त्यामुळे आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरिराचा उपयोग व्हावा असा विचार इंद्रायणी पाटील यांच्या मनात आला होता. त्यामुळे त्यांनी तो त्यांच्या मुलांना बोलून दाखवला. त्यानुसार पाटील कुटुंबीयांनी लातूर मेडिकल कॉलेज मध्ये मरणोत्तर देहदानाची प्रक्रिया पूर्ण केली होती. दि. २६ जानेवारी ला पहाटे ५ वाजता त्यांचे निधन झाले. त्यानंतर माधवराव पाटील यांनी कसलाही विलंब न करता सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांना फोनवरून ही माहिती दिली. त्यानंतर जोशी यांनी ताबडतोब हालचाल सुरू केली. लातूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये कॉल करून ही माहिती सांगितली. त्यानंतर त्यांनीही तयारी सुरू केली. रमाकांत जोशी यांनी स्पर्श रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांचे पथक उदतपुर येथे पाठवून दिले. त्या पथकाने ईसीजी, तपासणी करून मृत्यू प्रमाणपत्र दिले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह लातूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आला. त्यानंतर त्यांच्या मुलांनी देहदानाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे संमतीपत्र, कागदपत्रे दिली व ती प्रक्रिया पूर्ण केली.
मानवी देह हा नाशवंत आहे. मृत्यूनंतर तो उपयोगी पडावा म्हणून हा मोठा निर्णय पाटील कुटुंबीयांनी घेतला. यामुळे मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधनासाठी खूप मोठा उपयोग होणार आहे. मेडिकल सायन्समध्ये संशोधन करण्यासाठी हे आवश्यक आहे. यामुळे मेडिकल सायन्स मध्ये आणखी संशोधन करता येऊ शकते. त्यामुळे पाटील कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयामुळे एक आदर्श निर्माण झाला आहे. मृत्यूनंतर देहदान करण्याची लोहारा तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.