लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे मानवलोक संस्थेच्या वतीने आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात एकूण १२० जणांची तपासणी करण्यात आली.
तालुक्यातील सालेगाव येथे मानवलोक संस्था अंबेजोगाईच्या सालेगाव उपकेंद्रा अंतर्गत ज्येष्ठ निराधार नागरिकांसाठी नऊ गावात तृप्ती उपक्रम सुरु आहे. या निराधारांची दोन वेळेच्या जेवणाची सोय केलीच जाते. त्याच बरोबर त्यांच्या आरोग्याची काळजीही घेतली जाते. अशा निराधार व ईतरही लोकांसाठी मानवलोक आणि स्पर्श ग्रामिण रूग्णालय सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी करुन मोतीबिंदूचे निदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सालेगावच्या सरपंच भागीरथी पाटील, कलदेव निंबाळाच्या उपसरपंच सुनिता पावशेरे, गोविंदराव साळुंके, स्पर्श ग्रामिण रूग्णालयचे प्रकल्प समन्वयक रमाकांत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात डॉ.अतीफ पटेल, डॉ. दस्तगीर मुजावर, डॉ. युवराज हाके, व टिमने १२० लाभार्थीची तपासणी करून औषधोपचार केले. १५ रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निदान करण्यात आले. दि. २४ मार्च रोजी ग्रामिण रूग्णालय लोहारा येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. संस्थेचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वी करण्यासाठी तृप्ती किचनच्या विभाग प्रमुख जयश्री शिर्के, डॉ. ज्योती दबडे, यामिनी बजाज, सालेगाव उपकेंद्र प्रमुख बंडू पाटील, शिवाजी गुरव यांच्यासह नऊ गावातील अन्नपूर्णा ताईं यांनी परिश्रम घेतले. यावेळी सुनिता पावशेरे यांनी सर्वांच्या वतीने मानवलोक व स्पर्श रुग्णालयाचे आभार मानले.