तहानलेल्यांना पाणी द्या, भुकेल्यांना अन्न द्या, दीनदुबळ्या दृष्टीहीनांना योग्य दिशा द्या, हाच मानव धर्म असून आपल्या धर्मावर श्रद्धा ठेवत असतानाच इतरांच्या धर्माविषयी सहिष्णुता पाळत गेलात तर जगात शांतता नांदेल असे मार्गदर्शन रंभापुरी महापिठाचे जगद्गुरु डॉ. प्रसन्ना रेणुकावीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी जेवळी येथे केले.
तालुक्यातील जेवळी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठाचे वास्तु पूजन, लोकार्पण व श्री विरभद्रेश्वर मंदिर कळसारोहण कार्यक्रम सोमवारी (दि.७) रंभापुरी महापिठाचे जगद्गुरु डॉ. प्रसन्ना रेणुकावीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील अनेक मठाधीश, शिवाचार्य, संत- महंत, हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत धर्मसभा पार पडली. याप्रसंगी जगद्गुरु डॉ. प्रसन्ना रेणुकावीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी उपस्थित भावीक भक्तांना मार्गदर्शन केले. या धर्मसभेच्या व्यासपीठावर माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, मठाधीश मनीप्र गंगाधर महास्वामीजी (जेवळी), शिवयोगी शिवाचार्य (अणदूर), जयशांतलिंग शिवाचार्य (हिरेनागाव), धनलिंग रुद्रमणी शिवाचार्य (राजेश्वर), राजशेखर शिवाचार्य (कलबुर्गी), शिवमूर्ती शिवाचार्य (देवापूर), बसवलिंग शिवाचार्य (अक्कलकोट), श्रीकांत शिवाचार्य (नागणसूर), हभप महेश महाराज (माकणीकर), शिवानंद शिवाचार्य (जळकोट), श्रीपती पंडिताराध्य शिवाचार्य (हळ्ळीखेड), चन्नमल्ला शिवाचार्य (हुडगी), लातूरचे माजी महापौर सुरेश पवार, माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामचंद्र अलुरे, दिपक जवळगे, भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, आकांक्षा चौगुले, दिलीप भालेराव, आनंद गायकवाड, शिवानंद दानाई, विजयकुमार स्वामी, महेश पाटील, सुंदर पाटील- कवेकर, सदानंद शिवदे- पाटील, शंकर जट्टे, अविनाश माळी, हरी लोखंडे, धर्मराज पाटील, शरणाप्पा काडला, सिद्धाना कल्ला आदींची उपस्थिती होती. या धर्मसभेचे प्रास्ताविक वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य (वसमत), सूत्रसंचालन महादेव शिवाचार्य महास्वामीजी (वाई) व सुधीर येणेगुरे यांनी केले.

यावेळी कळशारोहण कार्यक्रमासाठी गावातील व परिसरातील लेकींना आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी पाच हजार सुवासिनीचे पूजन व ओटीभरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची तयारी जवळपास तीन महिन्यापासून सुरू होती. आठवडाभर अनेक कार्यक्रम सुरू होते. याकाळात लाखो भाविकांनी उपस्थित लावली. याकाळात मोठी गर्दी असूनही नियोजन व नागरिकांच्या पुढाकाराने हा सोहळा सुरळीत पार पडला.
येथील मठाधीश मनिप्र गंगाधर महास्वामीजी यांनी या मठाचे बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय फेटा बांधणार नाही असा संकल्प केला होता. आज मठाचे कार्य पूर्ण झाल्याने माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक भक्ताकडून सुवर्ण दान करून मठादिशांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान या निमित्त येथे आठवडाभर शिव कथाकार हरीहरानंद भारती स्वामीजी (धारुर) यांचा शिव कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. रविवारी (दि.६ ) या शिव कथेचा काशी महापिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता झाली. यावेळी नाथ संस्थान औसाचे पिठाधिपती हभप गुरुबाबा महाराज यांच्यासह परिसरातील मठाधीश, शिवाचार्य व हजारो श्रोतेगण उपस्थित होते.
