लोहारा (Lohara) तालुका कृषी कार्यालयाच्या कामकाजाची गुणवत्ता आणि शेतकरीभिमुख सेवेची दखल घेत या कार्यालयाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ (ISO) ९००१:२०१५ (क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम) हे मानांकन बहाल करण्यात आले आहे. यामुळे तालुक्याच्या प्रशासकीय वर्तुळात आणि शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हे मानांकन म्हणजे एकप्रकारे पारदर्शक आणि दर्जेदार सेवेची पावती आहे. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे व खतांचा पुरवठा, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार आणि सेंद्रिय शेतीला दिलेले प्रोत्साहन या निकषांवर हे मानांकन देण्यात आले आहे. या कार्यालयाने प्रशासकीय कामकाजात आणलेली सुसूत्रता आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचे केलेले निवारण यामुळे हे मानांकन मिळवणे शक्य झाले. कृषी योजनांचा लाभ थेट बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेली विशेष धडपड, यांत्रिकरण आणि प्रगत शेती पद्धतींचा वापर वाढवण्यासाठी राबवलेले उपक्रम, पीक विमा, हवामान आधारित सल्ले आणि उत्पन्न वाढीसाठी दिलेले मार्गदर्शन हे प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे सांगण्यात आले.

या मानांकनामुळे लोहारा तालुका कृषी कार्यालयाची जबाबदारी आता अधिक वाढली असून, आगामी काळात अधिक पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने सेवा देण्याचा मानस कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या यशाबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून तालुका कृषी अधिकारी महेश देवकाते व तकृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.







