वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद अभियान अंतर्गत दि. १५ जून ते १५ जुलै या कालावधीत माझी उपजीविका समृद्धी मोहीम राबविणे बाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त आहेत. त्यानुसार राष्ट्रिय ग्रामिण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत लोहारा तालुक्यातील कास्ती (बु) येथे सेंद्रीय निविष्ठा उत्पादन प्रात्यक्षिक कार्यशाळा घेण्यात आली. उपस्थित शेतकरी महिलांना पंचायत समितीचे कृषि अधिकारी डी. एल. मुळे यांनी बायोगॅस आणि विहीर या योजनेची माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान व राष्ट्रिय ग्रामिण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत सन २०१९-२० पासुन लोहारा तालुक्यात गटातील महिला शेतकरी यांच्यासाठी सेंद्रीय शेती अभियान चालु आहे. त्या अंतर्गत आज पर्यंत तालुक्यात एकुण २७ गावामध्ये २० सेंद्रीय शेतकरी गट कार्यरत आहेत व सेंद्रीय शेती करत आहेत. तालुका समन्वयक नरेंद्र गवळी यांनी सेंद्रीय शेती करत असताना तसेच बीबी एफ पध्दतीने पेरणी केल्यास उत्पन्नात वाढ, बियाणाची बचत, पिकात हवा व सुर्यप्रकाश भरपुर मिळतो, अति पाऊस झाल्यावर शेतातील पाणी शेताबाहेर जाण्यास मदत होते. यासाठी उपस्थित सर्व महिला शेतकरी यांना बीबीएफ पध्दतीने पेरणी करण्याचे आवाहन केले. उमेदचे प्रभाग समन्वयक प्रदिप चव्हाण यांनी माती परीक्षण, उगवण क्षमता, बिज प्रक्रीया करून बियाणे पेरणी करावी तसेच कीड व रोग नियंत्रणासाठी सेंद्रीय निविष्ठा दशपर्णी अर्क, जिवामृत, वेस्ट डी कंपोजर, अग्निअस्त्र, व्हर्मी वॉश, रंगीत सापळे, कामगंध सापळे, गांडुळ खत इ. सेंद्रीय निविष्ठांचे वापर कसे करावे याची माहिती दिली. या एक दिवसीय सेंद्रीय प्रात्यक्षिक निविष्ठा उत्पादन कार्यक्रम करिता लोहारा पंचायत समितीचे उपसभापती व्यंकट कोरे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढाकणे उपस्थित होते. उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार यांनी उपस्थित राहून सेंद्रीय निविष्ठांची पाहणी केली व महिला शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्यासाठी मार्गदर्शन केले. सेंद्रीय शेती निविष्ठा उत्पादन प्रात्यक्षिक कार्यक्रमात कृषि व्यवस्थापक सचिन गायकवाड, अंजली सरवदे, लक्ष्मी मोरे, संगीता कांबळे, शैला गोरे, कृषि सखी यांनी सेंद्रीय निविष्ठा प्रात्यक्षिक सेंद्रीय शेती करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना करून दाखविले.