वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागातील पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार संतोष रुईकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सोमवारी (दि. ४) हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हणले आहे की, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आजही अनेकांची पिके पाण्यामध्ये आहेत. सतत लागून राहिलेल्या पावसामुळे विशेषतः सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निम्न तेरणा नदीचे पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे नदीकाठच्या भागाचे नुकसान झाले आहे. परंतु उर्वरित तालुक्यातील भागामध्येही सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतामध्ये पीक जरी उभे दिसत असले तरी त्या सोयाबीन मधील सोयाबीन हे काळे पडले असल्याने उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचा परिणाम दरामध्ये सुद्धा झाला आहे. त्यामुळे तलाठी यांना आदेश देऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हाजी बाबा शेख, माजी सरपंच नवाज सय्यद, संजय जाधव, दादासाहेब रनखांब, यादव चव्हाण आदी उपस्थित होते.