वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील अरुंद सिमेंट रस्त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मागील दोन तीन महिन्याच्या कालावधीत जवळपास तीन चार चारचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीत गेल्या आहेत. त्यामुळे प्रभागातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये गाव तलावाच्या बाजूने एक सिमेंट रस्ता करण्यात आला आहे. जवळपास १५० मीटरचा हा सिमेंट रस्ता आहे. या रस्त्याची रुंदी १० फूट आहे. रस्त्याच्या एका बाजूला नालीचे काम करण्यात आले आहे. हा रस्ता अरुंद झाल्याने या रस्त्यावरून वाहने घेऊन जाणाऱ्यांना अडचणींचा सामना करत जीव मुठीत घेऊन जावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रभागातील नागरिका कडून व्यक्त केली जात आहे. हा रस्ता तयार झाल्यापासून समोरून गाव तलावाच्या बाजूने एखादी चारचाकी गाडी आली तर दुसऱ्या बाजूच्या चारचाकी चालकाला त्याची गाडी ६० ते ७० मीटर पाठीमागे घ्यावी लागत आहे. ती गाडी गेल्यानंतर आपली गाडी घेऊन जावी लागते. दोन अडीच वर्षापूर्वी हा रस्ता करण्यात आला आहे. त्यावेळी आमच्या प्रभागाच्या नगरसेविका व रस्ता करणाऱ्या गुत्तेदाराला आम्ही सांगितले होते की, रस्त्याची उंची कमी करा व रुंदी जास्त करा. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे आता प्रभागातील नागरिकांना त्रास होत आहे. शुक्रवारी लोहाऱ्याचा आठवडी बाजार असतो. या दिवशी तर या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मागील दोन तीन महिन्यात जवळपास तीन चार चारचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीत गेल्या आहेत. त्यामुळे प्रभागातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण आहे अशी संतप्त भावना प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. मंगळवारी (दि. १९) ही याच प्रभागात अरुंद सिमेंट रस्त्यामुळे टाटा इंडिका (एमएच १४ – बीए ५८७२) ही चारचाकी बाजूच्या नालीत गेल्याची घटना घडली आहे. जेसीबीच्या साहाय्याने ही चारचाकी काढण्यात आली. प्रभागातील ही अडचण दूर करण्यासाठी नगरपंचायतने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही अडचण दूर करावी अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.लोहारा शहरात बहुतांश प्रभागात सिमेंट रस्ते करण्यात आले आहेत. शहरातील एक दोन प्रभाग सोडले तर सर्व ठिकाणी हीच अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आमच्या प्रभागात गाव तलावाच्या बाजूने सिमेंट रस्ता करण्यात आला आहे. या ठिकाणी मागील पंधरा दिवसात चारचाकी नालीत गेल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. यामुळे जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण ?
संतोष फावडे, लोहारा शहर कार्याध्यक्ष, काँग्रेस सोशल मीडिया