वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अणदूर येथील हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या वतीने लोहारा व तुळजापूर तालुक्यातील कोरोना संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना बुधवारी (दि.३) तीन हजार रक्केमसह अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.हॅलो मेडिकल फाउंडेशन आरोग्य स्वराज्य प्रकल्पा अंतर्गत नेहमीच आरोग्य सेवेसह सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहते. कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या कुटंबांच्या मदतीसाठी फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत लोहारा आणि तुळजापूर तालुक्यातील कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्यांच्या ११२ कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रूपये तर कोरोनाबाधित गरीब रूग्णांना प्रत्येकी पाच हजार रूपयांची मदत करण्यात आली आहे. ऐन दिवाळी सणात महागाईने उच्चांक गाठला आहे. महागाईमुळे गरिबांचे जगणे कठीण झाले आहे. कोरोना काळात कुटुंबकर्त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी हॅलो मेडिकल फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. बुधवारी लोहारा तालुक्यातील अत्यंत गरीब असलेल्या गरजू ५० कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप माजी नगरसेवक श्रीनिवास फुलसुंदर, तानाजी माटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हॅलो मेडिकल फाउंडेशचे लोहारा तालुका समन्वयक सतीश कदम, श्रीकांत कुलकर्णी, स्वाती पाटील, ज्ञानेश्वर जाधव, दत्ता गुरव उपस्थित होते.