वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला लोहारा तालुका संभाजी ब्रिगेड चा पाठींबा आहे. त्यांच्या मागण्या तात्काळ मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. लोहारा तहसीलदार यांच्या मार्फत परिवहन मंत्री अनिल परब यांना बुधवारी (दि.१०) हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र.एस.टी. कामगार संयुक्त कृती समीतीच्या वतीने वरील नमूद विषयाच्या अनुषंगाने केलेल्या सर्व मागण्यांना आमचा सक्रिय जाहीर पाठिंबा असून सदरील मागण्या लवकरात लवकर मान्य न केल्यास राज्यभर संभाजी ब्रिगेड स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सरकारने आणि प्रशासनाने नोंद घ्यावी तसेच होणाऱ्या गंभीर परिणामांची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा ईशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे लोहारा तालुका अध्यक्ष धनराज बिराजदार, तालुका उपाध्यक्ष किरण सोनकांबळे, तालुका कार्याध्यक्ष बालाजी यादव, प्रसिद्धी प्रमुख प्रणिल सूर्यवंशी, तालुका सचिव खंडु शिंदे, तालुका कोषाध्यक्ष छगन फुलसुंदर, तालुका संघटक पवन चौधरी, तालुका संघटक अंगद मुळे, तालुका सरचिटणीस सुदर्शन लोमटे आदिच्या सह्या आहेत.