वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शेताशेजारील कारखाण्याचे पाणी शेतात सोडले जात असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे आमच्या शेतात येणारे हे पाणी तात्काळ बंद करावे तसेच माझ्या पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी लोहारा खुर्द येथील शेतकरी शिवराम रसाळ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.
या अर्जात त्यांनी म्हणले आहे की, मी लोहारा खुर्द येथील रहिवासी असून माझे सर्वे न. ७८/१ मधे जमीन आहे. सदर जमिनी मध्ये तीन एकर ऊस लागवड केले आहे. परंतु सदर जमिनी शेजारीच असलेल्या लोकमंगल शुगर इंडस्ट्रीज चे घाण पाणी आमच्या शेतात सोडण्यात येत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. मी यापूर्वी ही २०१७ मध्ये तहसीलदार यांच्याकडे याबाबत अर्ज दिला होता. परंतु त्यावेळी पाणी तात्पुरते बंद केले होते. पाणी सोडणे चालूच ठेवले असल्याने जमीन नापीक होऊन माझे न भरून येणारे नुकसान होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करावा व मला न्याय द्यावा अशी विनंती शेतकरी शिवराम रसाळ यांनी या अर्जाद्वारे केली आहे. सद्यस्थितीत शेतात ऊस पीक असून त्यामध्ये कारखान्याचे पाणी थांबले आहे. तरी माझी ऊस पिवळा पडला आहे. त्यामुळे तात्काळ पाणी बंद करून घ्यावे व मला माझ्या पिकाचे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करणारा अर्ज लोहारा खुर्दचे सरपंच, ग्रामसेवक यांनाही दिला होता.त्याप्रमाणे सरपंच सचिन व्यंकट रसाळ, सदस्य संभाजी पाटील, सचिन रसाळ, शेतकरी प्रभाकर रसाळ, संजय रसाळ, सुरेश रसाळ, पोलीस पाटील, बिरूदेव सूर्यवंशी, अजय रसाळ आदींनी शेतामध्ये जाऊन पाहणी केली. तसेच लोहारा खुर्द येथीलच शेतकरी श्रावण रसाळ यांनीही तहसीलदार यांच्याकडे लेखी अर्ज केला आहे. सर्व्हे नंबर ८२ व ८३ मधील त्यांच्या शेतात व विहिरीत कारखान्याचे घाण पाणी येत आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हणले आहे.