वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पुढे खेळण्याची जिद्द आणि चिकाटी तर आहे. मात्र त्यासाठी लागणारा खर्च करण्याची ऐपत नसल्याने औसा तालुक्यातील खानापूर तांडा येथील प्रतिभावान कुस्तीपटू लक्ष्मी सीताराम पवार ही ऑलम्पिक मध्ये खेळण्याची तयारी सोडून आईबाबां बरोबर ऊस तोडणीला निघाली होती. ही बाब आमदार सतीश चव्हाण यांना समजताच त्यांनी लक्ष्मीच्या कुटुंबाशी संपर्क साधून तिला मंगळवारी (दि.७ ) लोहारा येथे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात बोलावून तिच्या पुढच्या सर्व खर्चाची आणि प्रशिक्षणाची जबाबदारी उचलणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तालीम सोडून उसाच्या फडाकडे निघालेले लक्ष्मीचे पाय परत तालमीकडे वळले आहेत. लक्ष्मीला आमदार सतीश चव्हाणांनी दत्तक घेत पुण्याच्या एका आतंरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवत असलेल्या अकॅडमीत प्रवेश दिल्याने लक्ष्मीच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.लक्ष्मी सीताराम पवार ही कुस्तीपटू लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात येणाऱ्या खानापूर तांडा येथील रहिवासी आहे. आई वडील भाऊ यांनी कष्ट करून मिळविलेल्या पैशावर लक्ष्मी आपली प्रॅक्टिस करत होती. दोन एकर कोरडवाहू आणि बिनभरवशाची शेती साथ देत नसल्याने लक्ष्मीला पैसे पुरविण्यासाठी सगळे कुटुंब राबत होते. याचे चिजही लक्ष्मीने केले. तिने राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार तर २०२० मध्ये खेलो इंडिया अंतर्गत ओडिशा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तिला ऑलम्पिक मध्ये खेळण्याचा ध्यास लागला होता. या स्पर्धेची तयारी करण्यासाठी तशी तालीम, खुराक आणि प्रशिक्षक हवा होता. त्यासाठी खूप खर्च येणार असल्याने लक्ष्मीच्या कुटुंबाने खूप प्रयत्न केले मात्र थोडीफार इतर लोकांनी मदत केली. तीही तोकडीच ठरू लागली. स्वतःच्या जीवाचा विचार न करता आई बाबा आणि भाऊ करीत असलेली मेहनत आणि कष्ट लक्ष्मीने डोळ्याने पाहिले होते. आता ऑलम्पिकची तयारी करण्यासाठी लागणारा खर्च तिला पेलवणार नव्हता म्हणून तिने तिचा खेळ थांबवून आई बाबा सोबत ऊस तोडणीला जाण्याचा विचार केला.ही गोष्ट मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना समजताच त्यांनी तात्काळ लक्ष्मीच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि तिच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी उचलत तिला पुण्यातील नामवंत किरण मोरे यांच्या अकॅडमीत प्रवेश दिला. यापुढे लक्ष्मीला खर्चाची चिंता राहिली नसून ती आता ऑलम्पिक मध्ये पदक जिंकण्याच्या जिद्दीने कामाला लागली आहे. परिस्थितीत भरडून आपले ध्येय अर्ध्यावरच सोडणाऱ्या लक्ष्मीला मोठा आधार मिळाल्याची सर्वत्र चर्चा होत असून लक्ष्मीने खेळावर लक्ष केंद्रित करून जिद्दीने खेळावे आणि ऑलम्पिक पदक मिळवावे. आम्ही सर्व तिच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया आमदार सतीश चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिली. लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात मंगळवारी (दि.७) झालेल्या तिच्या सत्कार समारंभात आमदार सतीश चव्हाण यांनी लक्ष्मी चा सत्कार केला व तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. सतीश इंगळे, शहाजी मोहिते, हनुमंत कारभारी, प्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी आदी उपस्थित होते.