वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतच्या चार जागांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.१८) सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान पार पडले. एकूण १७३१ पैकी १५१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी ८७.४६ टक्के मतदान झाले. किरकोळ शाब्दिक वाद वगळता चारही ठिकाणी मतदान शांततेत पार पडले.
लोहारा नगरपंचायतच्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणास स्थगिती दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या प्रभागाची निवडणूक स्थगित केली होती. त्यामुळे १३ जागेसाठी निवडणूक पार पडली होती. त्यानंतर उर्वरित प्रभाग क्रमांक ८, १०, १६ व १७ या चार जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या चार जागांसाठी एकूण २२ जण निवडणूक रिंगणात होते. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारयंत्रणा राबविली होती. प्रभाग क्रमांक ८, १०, १६ व १७ या चार जागांसाठी मंगळवारी (दि.१८) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान पार पडले. यासाठी निवडणूक विभागाने चार मतदान केंद्राची व्यवस्था केली होती. प्रभाग क्र. ८ मध्ये ३७३ मतदार होते. त्यापैकी ३३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्र. १० मध्ये ४८५ मतदार होते. त्यापैकी ४२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्र. १६ मध्ये ३६२ मतदार होते. त्यापैकी ३२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर प्रभाग क्र. १७ मध्ये ५११ मतदार होते. त्यापैकी ४३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चार प्रभागातील एकूण १७३१ मतदारांपैकी १५१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी ८७.४६ टक्के मतदान झाले. या निवडणुकीच्या सर्वच १७ जागांची मतमोजणी बुधवारी (दि.१९) सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. यासाठी चार टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.