वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने १७ पैकी ११ जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर ही उत्सुकता संपली असून नगराध्यक्ष पदासाठी मंगळवारी (दि.८) शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून शिवसेनेच्या नगरसेविका वैशाली खराडे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
लोहारा नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांपैकी शिवसेना ९ व राष्ट्रवादी काँग्रेसचे २ असे एकूण ११ जागी शिव राष्ट्र आघाडीचे उमेदवार विजयी झाले. तर काँग्रेसचे ४ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत दोन जागी अपक्ष उमेदवार विजयी झाले. यापैकी अपक्ष निवडणूक लढविलेले अमीन सुंबेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे लोहारा नगरपंचायतमध्ये शिवराष्ट्र आघाडीचे संख्याबळ हे १२ झाले आहे. त्यामुळे नगरपंचायतीची सत्ता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवराष्ट्र आघाडीच्या ताब्यात आल्याचे स्पष्ट झाले. मंत्रालयात नगराध्यक्ष पद आरक्षण सोडत झाली. यात लोहारा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे खुला प्रवर्गासाठी सुटले. त्यानंतर नगराध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे नगरसेवकांसह शहरवासीयांचे लक्ष लागले होते. नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार दि. ८ रोजी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करावयाचा होता. त्यामुळे मंगळवारी (दि.८) सकाळी उमरगा येथे नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीसाठी माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, उमरगा बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, शिवसेनेचे लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, किशोर साठे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत इच्छुकांची मते विचारात घेऊन नगराध्यक्ष पदासाठी नगरसेविका वैशाली खराडे यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान वैशाली अभिमान खराडे यांनी मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच काँग्रेसकडून नगरसेवक प्रशांत काळे यांचाही अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष आयनोद्दीन सवार, युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, गटनेते आरिफ खानापुरे, विजय ढगे, के. डी. पाटील रौफ बागवान, रफिक शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.नगराध्यक्ष निवड करण्यासाठी दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता नगरपंचायत कार्यालयात नगरपंचायतीच्या सर्व सदस्यांची विशेष सभा होणार आहे. या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गणेश पवार राहणार आहेत. त्याच दिवशी सकाळी १० ते १२ या कालावधीत उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. नगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याच सभेत उपनगराध्यक्ष पदाची निवड करण्यात येणार आहे.