वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत लोहारा ग्रामीण रुग्णालयात दि. १८ एप्रिल रोजी आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विशेष तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा भाग म्हणून लोहारा ग्रामीण रुग्णालयात या आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या आयोजनाकरिता तालुका स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या मेळाव्यात विशेष तज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार असून त्यांच्या विशेष सेवांचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थींना मिळावा या करिता प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी, उपकेंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्या गरजू नागरिकांना, तर ग्राम स्तरावर आशा स्वयंसेविका मार्फत गरजू नागरीकांना निरोप देण्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी यांनी आदेश दिले असून त्यांना ग्रामीण रुग्णालय लोहारा येथे तपासणीसाठी आणण्याकरिता ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली जाणार आहे. या मेळाव्यात स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, शल्यचिकित्सक, नेत्ररोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी होणार आहे. तसेच आरोग्य शिक्षण, योग्य आहार, आरोग्य समुपदेशन, जीवनशैली, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, यूनिक हेल्थ आयडी काढणे आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच काही रूग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्यास जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे संदर्भित करून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या आरोग्य मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद साठे, सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले आहे.