वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका व्यवस्थापन कक्ष लोहारा व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सास्तुर यांच्या संयुक्त विद्यमाने सास्तूर प्रभागातील महिला स्वयंसहायता गटांना बुधवारी (दि.२०) कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सात गटांना पंधरा लक्ष रुपये कर्ज वाटप करण्यात आले.
लोहारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे व तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सास्तूर प्रभागातील महिला स्वयंसहायता गटांना या कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून महिलांचे खऱ्या अर्थाने आर्थिक व सामाजिक उन्नती होत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक राजीव गांजरे यांनी केले. सास्तुर येथील उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता गटांना कर्ज वितरण मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उमेद अभियान अंतर्गत सास्तुर प्रभागातील सात गटांना पंधरा लक्ष रुपये कर्ज वाटप करण्यात आले. सदर कर्जातून महिला स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून शाश्वत उपजीविका उभा करण्यासाठी महिलांना उमेद अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण प्रशिक्षण व मार्केट जोडणीसाठी मदत केली जाणार असल्याचे तालुका व्यवस्थापक राहूल मोहरे यांनी सांगितले.
या मेळाव्यामध्ये ग्राम संघाचे पदाधिकारी स्वयंसहायता गटाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक प्रीतम बनसोडे यांनी तर प्रभाग कृषी व्यवस्थापक सचिन गायकवाड यांनी आभार मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रभाग पशु व्यवस्थापक प्रदीप लोंढे, प्रेरिका रेश्मा कादरी, अनुसया नटवे, त्रिशला मुगळे, विजयमाला देशमुख, बँक सखी मालन कांबळे, प्रभाग व्यवस्थापक योगिता थोरात यांनी परिश्रम घेतले. गटांना दिलेल्या कर्जाची १०० टक्के परतफेड सुनिश्चित करणार असल्याचे प्रभाग समन्वयक प्रीतम बनसोडे यांनी सांगितले.