वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात गुरुवारी (दि.८) उद्योजकता विकास केंद्र, उस्मानाबाद यांच्या वतीने उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याचे उद्योजकता विकास केंद्राचे प्रोजेक्ट ऑफिसर पांडुरंग मोरे व मुंबई येथील उद्योजक व प्रेरणादायी वक्ते अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुणे यांची ओळख प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर यांनी करून दिली. श्री. पांडुरंग कांबळे यांनी उद्योजकता ही काळाची गरज असून नोकऱ्यांचे प्रमाण कमी होऊन बेरोजगारी वाढल्याने तरुणांनी उद्योग स्थापन केल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगितले तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी शासन विविध योजनांद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करीत असल्याने सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
युवा प्रेरणादायी वक्ते श्री. अशोक चव्हाण यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा असल्याचे प्रतिपादन करून स्वप्न, ध्येय, आत्मविश्वास, शिस्त यांच्याद्वारे कोणताही व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकतो, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भगत, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आयुब शेख, प्रवीण पाटील, अभिजित लोभे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर यांनी प्रमुख मार्गदर्शक व पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.