वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
स्पर्श ग्रामीण रुग्णालयात आयोजित महाआरोग्य शिबिरामधून अनोख्या मानवतेचे, शिस्तीचे व सौदार्हाचे दर्शन झाले असे उद्गार माजी जि. प. सदस्या शीतल पाटील यांनी काढले. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील यांनी बुधवारी (दि.२८) आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमासाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, माजी जि. प. सदस्या शितल पाटील, प्रा. डॉ. तुळशीराम उकिरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळ यांच्या वतीने राहुल पाटील यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या पहिल्या दिवशी ७०३ तर दुसऱ्या दिवशी ५१२ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटर नेरूळ मुंबईचे प्रा. डॉ. तुळशीराम उकिरडे यांनी तेरणा हॉस्पिटलची भूमिका या शिबिरात विषद केली. अशा प्रकारची विविध शिबिरे तेरणा हॉस्पिटल मार्फत आयोजित करून अनेक रुग्णाच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे तसेच ग्रामीण भागातील गोरगरिबांचे लाखो रुपये वाचवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या शासकीय उपक्रमा अंतर्गत हे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात रुग्णाची विविध आजारासाठी आरोग्य तपासणी करण्यात आली. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल नेरूळचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रुग्णाची तपासणी केली. रुग्णांना समुपदेशन करत व्यवस्थित रांगेत उभे करून रुग्णाची तपासणी करण्यात आली व गरजू रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमाकांत जोशी यांनी केले. हे महाआरोग्य शिबीर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने सास्तूर येथे आयोजित केल्याबद्दल आ. राणाजगजितसिंह पाटील, राहुल पाटील यांचे त्यांनी आभार मानले. मुंबई येथील विविध तज्ञ डॉक्टरांचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला होईल असे ते म्हणाले. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील यांनी या शिबिराची भूमिका स्पष्ट केली. तसेच स्पर्श ग्रामीण रुग्णालय मार्फत दिल्या जात असलेल्या दर्जेदार आरोग्य सेवेबद्दल स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे आभार मानले. यावेळी गटविकास अधिकारी शीतल खिंडे, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. अजित निळे, डॉ. दीपक बाराते, डॉ. वैष्णवी निंबाळकर, डॉ. अभिषेक, डॉ. निधी, डॉ. नेहा मंठाळे, प्रा. डॉ. तुळशीराम उकिरडे, जनसंपर्क अधिकारी तेरणा हॉस्पिटल विनोद ओहाळ, निशिकांत लोकरे, पवन वाघमारे, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ञ डॉ. मिरा देशपांडे, डॉ. दीपिका चिंचोळी, डॉ. मृणालिनी बुटूकणे, डॉ. अशोक मस्के, डॉ. वैभव माडजे, सास्तुरचे सरपंच यशवंत कासार, उपसरपंच राजवर्धन पाटील, माजी सरपंच विजयकुमार क्षीरसागर उपस्थित होते. या शिबिरामध्ये तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळच्या १२ तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. अच्युत आदटराव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.