वार्तादूत – डिजिटल न्यूज नेटवर्क
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दत्त नगर व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. ११) बँक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. निलंगा तालुक्यातील अंबुलगा आणि मदनसुरी प्रभागातील उमेदच्या एकूण 23 बचत गटांना 66 लाख रक्कमेचे कर्ज वितरण करण्यात आले. या कर्ज मेळाव्यास जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अनंत कसबे, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदशन केले. उमेद बचत गटातील महिलांनी बँक कर्जाचा विनियोग गावस्तरावर विविध उपजीविका निर्माण करण्यासाठी व आपल्या कुटुंबाच्या उत्पनात वाढ करून बँक कर्जाची नियमित परतफेड करावी व बँकेत आपली पत कायम ठेवावी तसेच शासनाच्या CMEGP, PMEGP व PMFME या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय वृद्धी करण्यसाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन करून जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी बँक कर्जाच्या माध्यमातून महिलांना अर्थ व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येण्याची चांगली संधी निर्माण झाली असून या कर्जातून ग्रामीण भागातील पारंपरिक उत्पादनांची चांगली पॅकेजिंग व ब्रँडिंग करून आधुनिक बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे याबाबत सविस्तर माहिती देऊन महिलांना प्रेरित केले.
यावेळी उपस्थित निलंगा तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती यांनी ग्रामीण भागातील महिला या व्यवसायात पुरुषांपेक्षा नेहमीच एक पाऊल आहेत आपल्या उत्पादनाची बाजारात विक्री करताना ग्राहकाची नस ओळखून आपले व्यवसायिक कौशल्य व क्षमता विकसित केल्या पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी बाहेती यांनी आपल्या प्रगल्भ व्यवसायिक जीवनातील अनुभव विविध उदाहरणे व दाखले देऊन तसेच विनोदी शैलीत संवादात्मक पद्धतीने महिला समोर मांडले. उमेद तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या कुटूंबाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले पाहिजे. त्यासाठी गटाच्या माध्यमातून व बँकेच्या सहकार्याने मिळणाऱ्या कर्जाच्या वापर उपजीविका वृद्धीसाठी करावा असे प्रतिपादन केले.
या बँक मेळाव्याचे प्रस्ताविक शाखा व्यवस्थापक नितीन शिरभाते यांनी केले. या मेळाव्याचे यशस्वी नियोजन फिल्ड ऑफीसर सुरेश कुरसंगे, प्रभाग समन्वय गोविंद रावते, नितीन रोडे यांनी केले. यावेळी बँक अधिकारी सुरेश मिश्राम, बँक कर्मचारी दिनेश सोळुंके, मिथुन पावसुरे तसेच उमेदचे तालुका व्यवस्थापक शरद समुखराव, अरुण शाहीर हे उपस्थित होते. यावेळी बँक सखी, सीआरपी व गटांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.