वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ड्रोनद्वारे ऊस पिकावर औषध फवारणीचा सोलापूर जिल्ह्यातील पहिला प्रयोग अकलूज येथे झाला. अकलूज येथील सहकारमहर्षी साखर कारखान्याच्या वतीने ड्रोनद्वारे औषध फवारणी कशी करायची? हे शेतकऱ्यांना दाखवून देण्यात आले.
ड्रोनचा वापर आतापर्यंत साधारण फोटोग्राफीसाठीच होत असल्याची माहिती येथील नागरिकांना होती. परंतु मंगळवारी अवघ्या पाच मिनिटांत एकरभर क्षेत्रात ड्रोनद्वारे औषध फवारणी करता येते, याचा अनुभव येथील शेतकऱ्यांनी घेतला. कोल्हापूर येथील अमर देशमुख यांनी ड्रोनद्वारे औषध अचूक व कमी वेळात फवारता येते याचे प्रात्यक्षिक दाखवले. हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, कृषितज्ञ राजसिंह मोहिते पाटील, सहकारमहर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, सहकारमहर्षी कारखान्याचे उपाध्यक्ष ऍड. प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांच्यासह कारखान्याचे आजी-माजी संचालक, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलवडे व विद्यार्थी आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
🔴 कशी होते औषध फवारणी ?
औषध फवारणीसाठी हेक्साकॉप्टर व ऑक्टाकॉप्टर हे ड्रोन वापरण्यात आले. प्रतिबॅरल जेवढे औषध लागते तेवढे औषध ड्रोनच्या दहा लिटर क्षमतेच्या टाकीमध्ये भरले जाते. दहा लिटर पाण्यात एका बॅरलचे औषध मिसळून ही फवारणी होते. तेवढ्या औषधात केवळ पाच मिनिटांत एका एकरावर फवारणी होते. ड्रोन एकदा चार्ज केले की ते १२ मिनिटे औषध फवारू शकते. १२ मिनिटांत सुमारे दोन एकर क्षेत्र फवारून होते. त्यानंतर बॅटरी चार्ज करण्यास अर्धा तास लागतो, अथवा दुसरी बॅटरीही लावता येते.
अमर देशमुख यांनी उसासह, सोयाबीन, गहू, तूर आदी पिकांवर ड्रोनद्वारे औषध फवारणी केली आहे. उसासारख्या उंच पिकावर औषध फवारणी करण्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान मानले जात आहे. शंभर ते दीडशे एकर क्षेत्रावर फवारणी करायची असल्यास प्रतिएकर ७०० रुपयांप्रमाणे औषध फवारून दिले जाते.
🔴 शासनाकडून अनुदानही मिळेल
आम्ही सहकारमहर्षी कारखान्याद्वारे प्रायोगिक तत्त्वावर मंगळवारी ड्रोनद्वारे उसावर फवारणी करून घेतली आहे. ऊस उंच गेल्यानंतर त्यावर करपा, लोकरी मावा अथवा वेलीचा प्रादुर्भाव झाल्यास फवारणीची गरज असते. ती या तंत्रज्ञानामुळे सुलभ होणार आहे. शासनानेही या तंत्रज्ञानावर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखाना भविष्यात या संदर्भात योग्य ते धोरण जाहीर करेल अशी माहिती सहकारमहर्षी कारखान्या कडून देण्यात आली आहे.