वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा स्वातंत्र्यसंग्रामाचा अमृत महोत्सव या निमित्ताने आयोजित पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेचे शनिवारी (दि. १४) लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे आगमन झाले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाच्या प्रांगणात विद्यालयाच्या वतीने संवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले.
मराठवाडा जनविकास संघ पिंपरी चिंचवड यांच्या पुढाकाराने ही संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांचे जन्मस्थळ सिंदगी कर्नाटक ते त्यांचे समाधी स्थळ हैदराबाद पर्यंत ही यात्रा जाणार आहे. दि. १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनापासून २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपर्यंत ही संवाद यात्रा, कर्नाटक, महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा, विदर्भ व परत पिंपरी चिंचवड पुणे या मार्गाने ही संवाद यात्रा जाणार आहे. यात्रेत मराठवाडा स्वातंत्र्यसंग्रामात योगदान दिलेल्या स्वामी रामानंद तीर्थ व इतरांचा ज्वलंत इतिहास सांगत मराठवाड्याची अस्मिता जपून तिचा राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व कृषी विषयक विकास व्हावा यासाठी जनजागृती करत ही संवाद यात्रा निघालेली आहे असे प्रतिपादन मराठवाडा जनविकास संघाचे कार्याध्यक्ष नितीन चिलवंत यांनी केले. यावेळी श्यामसुंदरसिंह राजपूत, बुवा जाधव चिलवडी, स्वामी रामानंद तीर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. एल. जाधव, गावचे पोलीस पाटील संजय नरगाळे, लोहारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्यासह कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते.

प्रथमतः स्वामी रामानंद तीर्थ यांनी कार्य केलेल्या राष्ट्रीय शाळा हिप्परगा या संस्थेच्या स्मृतिप्रित्यर्थ असलेल्या स्मृतीस्तंभाचे व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संजय भोईटे यांनी राष्ट्रीय शाळेची माहिती सविस्तरपणे मान्यवरांना दिली. या शाळेने महान स्वातंत्र्य सैनिक घडवले. हे स्वातंत्र्यसैनिक आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर झटले. या राष्ट्रीय शाळा हिप्परगा व स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्वातंत्र्यसंग्रामाचा श्री गणेशा याच ठिकाणी केला. १४ जानेवारी १९३२ ला हिप्परगा येथे स्वामी रामानंद तीर्थ यांनी संन्यासाची दिक्षा घेतली आदी माहिती यावेळी त्यांनी सांगितली. त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात या सर्वांचे स्वागत विद्यालयाच्या वतीने करण्यात आले. यावेळी नितीन चिलवंत यांनी या यात्रेचा उद्देश आणि यात्रेच्या माध्यमातून करावयाची जनजागृती याची भूमिका याबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर बीजे यांनी केले. या कार्यक्रमासाठी बी. एस. स्वामी, जी. डी. मैंदाड, ए. व्ही. जाधव, एस. के. जाधव यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते.




