राज्यात मे 2017 ते मार्च 2021 पर्यंत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागांतर्गत ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे धरणातील तसेच पाझर तलाव, साठवण तलाव, सिंचन तलावामध्ये साचलेला गाळ उपसा करून धरणाची साठवण क्षमता पुनस्थापित होणार आहे. तसेच उपसा केलेला गाळ शेतात पसरविल्यास शेताची उत्पादन क्षमता वाढून एकंदरीत कृषि उत्पन्नात वाढ होणार आहे. धरणातील गाळ उपसा करण्यासाठी जास्तीत जास्त अशासकीय संस्थांनी आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
अशासकीय संस्थांना, तसेच पात्र शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्थांना यंत्रसामुग्री आणि इंधन या दोन्हीचा खर्च देणे प्रस्तावित आहे. तसेच अल्प व अत्यल्पभूधारक, विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा पुरेपूर लाभ घेता यावा, यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. अशासकीय संस्थांना गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि इंधन याकरिता 31 रुपये प्रति घनमीटर व पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी 35.75 रुपये प्रति घनमीटर प्रमाणे एकरी 15 हजार रुपयांच्या मर्यादेत व 25 एकर (37 हजार 500 रुपये) पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानामध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्थांनी तालुकानिहाय संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या जलसाठ्याची माहिती घेऊन संबंधित ग्रामपंचायतीच्या ठरावासोबत सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग, लातूर येथे प्रस्ताव सादर करावेत. या प्रस्तावासह जलसाठ्यामध्ये अंदाजे उपलब्ध गाळाच्या प्रमाणाचा उल्लेख असणे बंधनकारक राहील.
जिल्हास्तरीय समितीमार्फत संबंधित प्रस्तावावर वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांच्या अनुषंगाने संबंधित संस्थाची पात्रता व क्षमता तपासून एका जलसाठ्यासाठी एका संस्थेस कार्यकारी यंत्रणा व नमूद केलेल्या गाळाचे प्रमाण उपसण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. यानंतर पुढील कार्यवाही संबंधित यंत्रणेचे उप अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत धरणातील गाळ उपसा करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले अर्ज संबंधित यंत्रणेच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केलेले आहे.
पाझर तलाव, साठवण तलाव, सिंचन तलाव व धरणाशी संबंधित कार्यालयांचे पत्ते
1. जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, प्रशासकिय इमारत छत्रपती शिवाजी चौक, लातूर
2. जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती शिवाजी चौक, लातूर
3. कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सिंचन भवन, जुना औसा रोड, लातूर
4. कार्यकारी अभियंता, लातूर पाटबंधारे विभाग क्र 1., सिंचन भवन जुना औसा रोड, लातूर
5. कार्यकारी अभियंता, लातूर पाटबंधारे विभाग क्र.2, सिंचन भवन, जुना औसा रोड, लातूर
6. कार्यकारी अभियंता, निम्न तेरणा कालावा विभाग क्र.2, सिंचन भवन, जुना औसा रोड, लातूर