लोहारा तालुक्यातील जेवळी येथील अंगणवाडी कार्यकर्ती मनिषा माने यांना जेवळी ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल माने यांचा त्यांच्या वर्गमित्रांनी सत्कार करून कौतुक केले आहे.
साधारण २८ वर्षापूर्वी श्री बसवेश्वर हायस्कूल जेवळी येथील १९९५ साली दहावी इयत्तेतून उत्तीर्ण होऊनही वर्ग मित्र व परिवार हा कुटुंबच या ध्येय धोरणातून मार्गक्रमण करणारे वर्ग मित्र आजही पाहण्यास लाभत आहेत. कांही दिवसांपुर्वी वर्ग मैत्रीण अंगणवाडी कार्यकर्ती मनिषा भारत माने (बंडगर) यांच्या कार्याची दखल घेवून ग्रामपंचायत कार्यालय जेवळी यांच्या वतीने महाराष्ट्र शासन पुरस्कृत, महिला व बाल विकास विभाग आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बाल मैत्रीण व वर्ग भगिनीला मिळालेला पुरस्काराची दखल घेत अभियंता प्रसाद पाटील पुणे यांच्या संकल्पनेतून मुख्याध्यापक कल्याणी ढोबळे यांच्या पुढाकारातून तसेच परमेश्वर सुरवसे, संजय देसाई यांच्या उपस्थितीत व चित्रा चटगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, हार व पुष्पगुच्छ देवून माने यांचा यथोचित सत्कार व गुणगौरव करण्यात आला. जवळपास २८ वर्षानंतरही टिकवलेली मैत्री, ठेवलेली जाण व केलेले कोडकौतुक यामुळे वर्ग भगिनी श्रीमती मनिषा भारत माने (बंडगर) यांनी वर्ग मित्र, मैत्रीणी व परिवाराचे आभार व्यक्त करून समाधानाची भावना व्यक्त केली.