लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठात सोमवारी (दि.३) गुरुपोर्णिमा उत्सवानिमित्त मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या सानिध्यात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्तानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागात असलेल्या या परिसरात वीरशैव लिंगायत संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. वीरशैव धर्मातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परंपरा जोपासण्यासाठी अद्यापही येथे मठ परंपरेला महत्त्व आहे. भूकंपात जेवळी येथे प्राणहानी बरोबरच मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. यात जेवळी येथील बेन्नीतुरा नदीकाठी असलेल्या श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठाचेही नुकसान झाले होते. जेवळी गावच्या पुनर्वसनानंतर दहा वर्षांपूर्वी परिसरातील भाविक भक्तांनी एकत्र येत जवळपास सव्वा कोटी रुपये लोक वाटा गोळा करून आधुनिक पद्धतीच्या मठाची निर्मिती केली आहे. आता येथे वेळोवेळी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. सोमवारी (दि.३) गुरूपौर्णिमा निमित्त मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
सकाळी सात वाजता येथील श्री विरभद्र मंदिरात रूद्राभिषेक, आठ वाजता श्री गुरूपाद पुजा, मंगल आरती, भजन यानंतर भाविकांना श्री गुरू गंगाधर महास्वामीजी यांचे दर्शन- आशीर्वाद, सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील सात ते आठ हजार भाविक भक्त दर्शन व महाप्रसादासाठी उपस्थित राहिले. यावेळी दिवसभरात आमदार ज्ञानराज चौगुले, मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापुराव पाटील, उपसभापती बसवराज कारभारी, लातूरचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, लोहारा तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागण्णा वकील, अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे, पंचायत समितीचे माजी सभापती बुद्धिवंत साखरे, नगरसेवक हरी लोखंडे, गोविंद पाटील, सिद्रामप्पा खराडे, शंकर जट्टे, उल्हास घुरघुरे आदीनी गुरुपोर्णिमा निमित्त उपस्थित राहत आशिर्वाद घेतले. या उत्सवासाठी सीमावर्ती कर्नाटक- महाराष्ट्र भागातील विविध गावातून नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिसरातील भाविक भक्तांनी पुढाकार घेतला.