लोहारा शहरासह तालुक्यात मंगळवारी (दि.१८) मध्यम व संततधार पाऊस झाला. या पावसामुळे पुढील काही दिवसांत रखडलेल्या पेरण्या सुरू होतील.
यावर्षी पावसाने तब्बल एक महिना उशिराने सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तब्बल एक महिना पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. तालुक्यातील तुरळक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या. परंतु पाऊस न झाल्याने तेही पिके अडचणीत आली होती. परंतु मागील आठवड्यापासून तालुक्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडत आहे. त्यामुळे खोळंबलेल्या पेरण्या उरकून घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. सोमवारी (दि.१७) रात्रीपासून लोहारा शहरासह तालुक्यातील बहुतांश ठिकाणी संततधार सुरू आहे. मंगळवारी (दि.१८) सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू होता. अधून मधून मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान मंगळवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरू होता. उशिरा का होईना पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.