लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) मंगळवारी (दि. १३) राष्ट्रीय जंतनाशक दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त रॅली काढून व पथनाट्य करून जंतनाशक दिवस याविषयी जनजागृती करण्यात आली.
राष्ट्रीय जंतनाशक दिवसाचे (National Deworming Day ) औचित्य साधून जिल्हा रुग्णालय धाराशिव, स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर व एमआयएमएसआर मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सास्तूर गावात जनजागरण रॅली काढण्यात आली. स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी आर.बी. जोशी यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्तराज ठोंबरे, एम.आय.एम.एस.आर. मेडिकल कॉलेजचे डॉ. ज्ञानेश्वर डिगोळे, डॉ. मृणाली पुजारी, डॉ. अरमान शेख, गणेश कराड यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली.
जंत संसर्ग कसा होतो याविषयी रॅलीमधून घोषणा देऊन सांगण्यात आले. जंत संसर्ग झाल्यास मुलात होणारे बदल कुपोषण आणि रक्तक्षय होऊन त्यांना सतत थकवा जाणवतो. त्याची शारीरीक वाढ व विकास पूर्णत होत नाही. जंत नाशक गोळी बरोबर जंतापासून बचावासाठी घ्यावयची काळजी घरा सभोवतालचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा, पायात नेहमी बूट- चप्पल घालावा, उघड्यावर शौचास बसू नये, नेहमी शौचालयाचा वापर करावा, आपले हात साबणाने विशेषत: जेवणाआधी आणि शौचाहून आल्यानंतर, नेहमी स्वच्छ पाण्याने फळे व भाज्या धुवाव्यात, खाण्याचे पदार्थात नेहमी झाकून ठेवावेत, नेहमी स्वच्छ पाणी प्यावे, नखे स्वच्छ ठेवा व नियमित कापा ई. पासून जंत संसर्ग रोखण्यासाठी मदत होते.
दि. १३ फेब्रुवारी रोजी सर्व १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलीनी शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळ्या घ्याव्यात असे आवाहन ग्रामीण रुग्णालय स्पर्शचे प्रकल्प अधिकारी आर.बी. जोशी यांनी केले. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले कि, ज्या मुला-मुलीना दि. १३ फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळ्या दिल्या नसतील त्यांनी दि. २० फेब्रुवारी रोजीच्या मॉम-अप दिनी गोळ्या घ्याव्यात. रॅलीमध्ये स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक तसेच एम.आय.एम.एस.आर. मेडिकल कॉलेजचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्पर्श ग्रामीण रुग्णालय सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.