वार्तादूत – लोहारा – सुमित झिंगाडे : लोहारा शहर व तालुक्यातील मोघा बु, उंडरगाव, शिवकरवाडी, कास्ती, नागुर शिवारात शुक्रवारी ( दि. १२) दुपारी चार च्या सुमारास अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे ऊस, कांदा पिकासह आंब्याचे व ईतर फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
लोहारा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून शुक्रवारी अवकाळी पाऊस झाला. यावेळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोघा बु. येथील शेतकरी शिवराज अंकुश कुंभार यांच्या शेतातील आंब्याचे झाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गावातील तात्याराव सर्यभान सूर्यवंशी यांच्या घरावरील पत्रे उडाले. तसेच यशवंतराव पाटील यांच्या घरासमोरील आंब्याचे झाड त्यांच्या घरासमोरील चार चाकी वाहनावर पडले. यात वाहनाचे नुकसान झाले. तसेच यावेळी शेतकरी बाबासाहेब महादेव पाटील यांच्या शेतातील आंब्याचे झाड पडून नुकसान झाले आहे. येथील बाबुराव सूर्यवंशी यांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून या पाऊसात शेतात ठेवलेला कडबा भिजला. यावेळी परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला असून याची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यातून करण्यात येत आहे.