लोहारा तालुक्यातील भोसगा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी व्यंकट कागे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच निवडीसाठी शुक्रवारी (दि.२८) ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यात सरपंच पदी व्यंकट कागे यांची निवड झाली आहे.
तालुक्यातील भोसगा ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक दि. १५ जानेवारी २०२१ रोजी झाली होती. भोसगा ग्रामपंचायतमध्ये एकूण ९ ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यानंतर दि. ८ फेब्रुवारी २०२१ रोजी भोसगा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. शशिकला गोसावी यांची निवड झाली होती. त्यांनी दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे लोहारा तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्या आदेशानुसार सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार शुक्रवारी दि.२८ जून रोजी दुपारी दोन वाजता अध्यासी अधिकारी जे. टी. वग्गे यांच्या अध्यक्षतेखाली भोसगा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यात सरपंच पदाची निवड करण्यात आली. दि. २८ रोजी सकाळी १० ते १२ वाजता या कालावधीत नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, दुपारी १२ ते १ च्या दरम्यान प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी, त्यानंतर एक ते दोन या कालावधीत नामनिर्देशन पत्र माघारी घेणे व त्यानंतर दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा असा कार्यक्रम होता. सरपंच पदासाठी व्यंकट कागे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी जे. टी. वग्गे यांनी सांगितले. व्यंकट कागे यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांचा ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच शशिकला गोसावी, ग्रामपंचायत सदस्य अप्पाराव पाटील, मिलिंद सोनकांबळे, सुभाष बिराजदार, सुलताना शहा, शेषाबाई एकुंडे, संगिता पारदे, ग्रामसेवक जी. टी. इंगळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.