आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नवीन संकल्पनेतून आज जग पुढे जाऊ इच्छित आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे. विज्ञान (science) मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजात शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे आणि समाजामध्ये परिवर्तन घडवून आणले पाहिजे. विज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने केल्यास आपला देश प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही. जागतिकीकरणाच्या युगात विज्ञानाशिवाय प्रगती अशक्य आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. अप्पासाहेब सुर्यवंशी यांनी केले.
तालुक्यातील माकणी येथील बी.एस.एस आर्टस सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालयात विज्ञान मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विज्ञान मंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमात श्री माधवराव पाटील महाविद्यालय मुरुम येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. अप्पासाहेब सुर्यवंशी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव हे होते. उपप्राचार्य डॉ. धनाजी थोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांनी विज्ञानामुळे मानवी जीवनाचा प्रवास सुखकर झाला असून आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यन्त विज्ञानाच्या मदतीने आनंदी आयुष्य जगत आहोत. ह्या संकल्पना आता १०० वर्ष जुन्या काळातील असल्यामुळे नवीन संकल्पना मांडून आपण यापेक्षा अधिक सुखी जीवन जगण्यासाठी सक्षमपणे नवीन संशोधन करणे आवश्यक आहे असे मत याप्रसगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ . एस. आर. बिरादार यांनी केले. प्रा. डॉ. अतुल बिराजदार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुत्रसंचलन प्रा. चंद्रकात जाधव यांनी तर डॉ. सुर्यकांत कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. बालाजी जावळे, डॉ. व्ही. एन. पतंगे, डॉ. वाय. डी. माने यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.