ज्ञान प्रबोधिनी हराळी केंद्राच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या ‘स्वास्थ्य संवाद’ या प्रकल्पाचे सोमवारी (दि.१४) उद्घाटन करण्यात आले.
या प्रकल्पा अंतर्गत दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना सहाय्य तसेच महिलांमध्ये रक्तक्षय किंवा ॲनेमिया विषयी जागृती असे दोन उपक्रम राबवले जाणार आहेत. हा प्रकल्प लोहारा तालुक्यातील हराळी, हिप्परगा (सय्यद), करवंजी, जेवळी (दक्षिण), शिवनगर तांडा आणि जेवळी (उत्तर) येथील बालाजी नगर, लक्ष्मी नगर वस्त्या या ठिकाणी होणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी या सर्व ठिकाणच्या आशा कार्यकर्त्या आणि महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याहून डॉ. निलांगी सरदेशपांडे तसेच उमरगा येथील सुविधा हॉस्पिटलच्या ज्योती सातपुते, दूरस्थ पद्धतीने डॉ. मनाली पटेल सहभागी झाल्या होत्या. निलांगी सरदेशपांडे यांनी सांगितले की, आरोग्य सेवेच्या बरोबरीने ग्रामीण भागात आरोग्य विषयक जनजागृती करणे, योग्य माहिती रुग्णांच्या आणि त्यांच्या कुटुंबियां पर्यंत पोहोचणे हे खूप महत्त्वाचे आहे. ज्योती सातपुते यांनी महिलांना स्वतः च्या आरोग्याची काळजी त्यांनी स्वतः घेणे गरजेचे आहे असे सांगितले. तसेच मनालीताई यांनी दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. प्रकल्पाची माहिती ज्ञान प्रबोधिनी हराळी केंद्राच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभाग प्रमुख गौरी कापरे यांनी सांगितली. या दोन्ही उपक्रमात समन्वयक म्हणून काम करणारे ज्ञान प्रबोधिनीचे कार्यकर्ते सचिन सूर्यवंशी आणि ज्योती गायकवाड याप्रसंगी उपस्थित होत्या. या प्रकल्पाला अमेरिकेतील डॉ. भाग्यश्री बारलिंगे यांच्या ‘अक्षयभाषा’ या सामाजिक संस्थेकडून मदत मिळाली आहे.