‘स्मृतिगंध; आठवणींचा आनंदसोहळा’ हा माजी विद्यार्थी मेळावा व शिक्षक सन्मान समारंभ लोहारा शहरातील हायस्कुल लोहारा शाळेत घेण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
लोहारा शहरातील हायस्कुल लोहारा शाळेतील दहावीच्या २००१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कुल लोहारा शाळेचे मुख्याध्यापक दयानंद पोतदार होते. यावेळी माजी मुख्याध्यापक टी. के. मक्तेदार, सुधाकर पवार, राम खुणे यांची प्रमुख उपस्थिती होती. हायस्कुल लोहारा शाळेत शिक्षण घेतलेल्या दहावीच्या २००१ बॅचच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा घ्यायचे ठरवले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन त्यावेळच्या माजी विद्यार्थ्यांना संपर्क करून त्यांचा व्हाट्सएप ग्रुप बनवला. या ग्रुपच्या माध्यमातून कार्यक्रमाविषयी चर्चा केली. यात त्यांना शिकवलेल्या माजी शिक्षकांचा व सद्यस्थितीत असलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्याचे निश्चित केले. त्यानुसार रविवारी (दि.१०) हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी माजी शिक्षकांचा व सद्यस्थितीत असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यात मानपत्र व भेटवस्तू देण्यात आली. त्यानंतर माजी मुख्याध्यापक टी. के. मक्तेदार व राम खुणे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमधून तानाजी माटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक दयानंद पोतदार यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले की, या कार्यक्रमास तुम्ही जे नाव दिलात ते अतिशय समर्पक आहे. तुम्ही ज्या शाळेत शिकलात त्या शाळेचा तुम्हाला अभिमान असला पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलात त्याच पद्धतीने भविष्यातही एकत्र राहा असे आवाहन मुख्याध्यापक दयानंद पोतदार यांनी केले.
अध्यक्षीय समारोपानंतर स्नेहभोजन झाले. यावेळीही विद्यार्थ्यांनी एकमेकांसोबत गप्पा मारत आस्वाद घेतला. स्नेहभोजन झाल्यानंतर या कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी दहावीनंतरचे आयुष्य यावर मनोगत व्यक्त केले. तब्बल २३ वर्षांनंतर भेट झाल्याने सर्व जण जुन्या आठवणींना उजाळा देत होते. इतक्या वर्षानंतर एकमेकांची भेट झाल्याने विद्यार्थ्यांनी एकमेकांसोबत फोटो काढून घेतले. हा कार्यक्रम सदैव स्मरणात राहील अशी भावना यावेळी अनेकांनी बोलून दाखवली. तसेच विद्यार्थी एकमेकांची विचारपूस करत होते. या बॅचचे काही विद्यार्थी मुंबई, पुणे, दुबई, सांगली, हैदराबाद, सोलापूर, लातूर, अक्कलकोट आदी ठिकाणी त्यांच्या जॉब निमित्त राहतात. ते विद्यार्थीही या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलेमान सौदागर व विनय राजे यांनी करून आभार मानले.