लोहारा तालुक्यातील माकणी येथील भारत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मंगळवारी (दि.१०) जागतिक मानवी हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. धनाजी थोरे होते. या कार्यक्रमानिमित्त डॉ. संजय बिरादार यांनी मानवी अधिकाराच्या अंमलबजावणीची गरज कशामुळे निर्माण झाली याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जाहीरनाम्यानुसार १९४८ पासून १० डिसेंबर हा ‘मानवी हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘मानवी हक्क’ हे मूलभूत आणि नैसर्गिक हक्क आहेत. जे माणसाच्या विकासासाठी अत्यावश्यक आहेत. हे हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, त्यांना सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी १० डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस’ म्हणून साजरा केला जातो. मानवाधिकार हे वंश, लिंग, राष्ट्रीयत्व, भाषा, धर्म, वय किंवा कोणताही भेदभाव न करता सर्व मानवांसाठी आहेत. मानवी हक्कांमध्ये जीवन आणि स्वातंत्र्याचा हक्क, गुलामगिरी व अत्याचार यांपासून मुक्तता, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, रोजगार आणि शिक्षणाचा अधिकार असे इतर अनेक हक्क समाविष्ट आहेत आदी मार्गदर्शन डॉ. संजय बिराजदार यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. सी. मुंडे यांनी तर डॉ. किरण लोमटे यांनी आभार मानले.