कर्नाटक राज्यातील भालकी येथे झालेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा विटंबन प्रकरणाच्या निषेधार्थ लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे मंगळवारी (दि. २१) कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील लिंगायत समाजाच्या वतीने मंगळवारी (दि.२१) सास्तुर गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद ठेवली. याप्रकरणी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे. ही घटना अतिशय गंभीर असून संपूर्ण समाजाच्या भावना दुखावणारी आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निषेध व्यक्त करते वेळी अनिल इंडे, कैलास मिटकरी, मिथुन कुर्ले, नंदेश औसेकर, सुनिल शिंदे, युवराज मिटकरी, आकाश इंडे, बालाजी माळी, कृष्णा भुरे, महेश भुरे, प्रसाद कुर्ले, शरण नरुणे, बळी माळी, ओंकार मिटकरी, पिंटू सांगवे, पिंटू दलाल, उमाकांत दलाल, किशोर मिटकरी आदींसह समाजबांधव उपस्थित होते.