गुढीपाडवा (gudhipadwa) सणानिमित्त प्रत्येक जण आपापल्या घरासमोर गुढी उभा करतो. आणि हिंदू (hindu) नववर्षाचे उत्साहात स्वागत करतो. परंतु लोहारा (lohara) तालुक्यात एक असे ही गाव आहे की ज्या गावात एकच गुढी उभा केली जाते. तालुक्यातील भातागळी (bhatagali) गावात एकच गुढी उभारली जाते. याहीवर्षी मंगळवारी (दि.९) मोठ्या उत्साहात ही गुढी उभारण्यात आली.
मागील अनेक वर्षापासून लोहारा तालुक्यातील भातागळी गावात चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजे गुढी पाडव्याला संपूर्ण गावातर्फे एकच गुढी म्हणजेच महादेवाची काठी महादेव (mahadev) मंदीरात उभारली जाते. शंभु महादेवाची अर्धागिनी असलेल्या पार्वतीचा अवतार समजून काटीची प्रतिकात्मक प्रतिष्ठापना करण्यात येते. मागील शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा अद्याप ही कायम सुरु असुन मंगळवारी ( दि. ९) भातागळी गावात एकच गुढी उभारण्यात आली आहे. लोहारा तालुक्यातील भातागळी गावात मागील अनेक वर्षांपासून दर वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी कोणाच्याच घरासमोर गुढी उभारण्याची परंपरा नाही. गावची गुढी एकच ती म्हणजे शंभो महादेवाची काठी उभारली जाते. ही काठी मंगळवारी ( दि. ९) सायंकाळी पाचच्या सुमारास उभारण्यात आली आहे. या गावातील भक्त गुढी पाडव्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच १२ एप्रिल ला पहाटे शेकडो भक्तमंडळी या महादेवाच्या काठीबरोबर पायी चालच ही शंभो महादेवाची काठी घेवून शिखर शिंगणापूरला जातात. साधारण भातागळी ते शिखर शिंगणापूर हे अंतर जवळपास ३०० किमीचे आहे. पायी प्रवास करत हे अंतर भक्त सहा दिवसात पूर्ण करतात. ही काठी भातागळी, लोहारा,उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातून प्रवास करत शिंगणापूर येथे जाते. ही काठी शिखर शिंगणापूरात मानाची काठी आहे. ही काठी परत गुढी पाडव्यानंतर येणाऱ्या पोर्णिमेला म्हणजे २५ एप्रिलला गावात येते. यादिवशी काठीच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव व परीसरातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यात महीला भक्तांची संख्या लक्षणीय असते. यादिवशी पासून तीन दिवस यात्रा असते. या यात्रेसाठी जे गावातील नागरीक कामधंद्यासाठी, नोकरीला बाहेर आहेत, ते गावाकडे येतात. विशेष म्हणजे सर्व जातीधर्माचे लोक या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सामील होतात. तसेच यात सर्व जाती धर्माच्या लोकांना मानाचे स्थान आहे.