लोहारा (Lohara) तालुक्यातील कोंडजीगड येथे रविवारी (दि.२२) प्रशासनाने सतर्कता दाखवत बालविवाह (child marriage) रोखला आहे. यावेळी दोन्ही कुटुंबाचे समुपदेशन करून अल्पवयीन मुलीच्या वडिलांकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कोंडजीगड येथे रविवारी बालविवाह होणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. धाराशिव बालविकास अधिकारी यांना मिळालेल्या माहितीनुसार कोंडजीगड येथील एका तेरा वर्षीय मुलीचा विवाह गावातीलच मुलासोबत होणार होता. त्यामुळे बालविकास अधिकारी कार्यालयास मिळालेल्या माहितीनुसार गावातील पोलीस पाटील दादासाहेब मुरटे, गावातील अंगणवाडी सेविका यांनी पोलीस कर्मचारी श्री. साखरे यांच्या सहकार्याने मुलीच्या आईवडिलांचे समुपदेशन करून समज दिली. व मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर विवाह करण्यात यावा याबाबतचे हमीपत्र मुलीच्या वडिलांकडून लिहून घेण्यात आले. तसेच यावेळी बालविवाह प्रतिबंध अधिनियमा नुसार काय शिक्षा होऊ शकते याबाबत माहिती सांगण्यात आली. प्रशासनाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा बालविवाह टळला. यावेळी पंच म्हणून पोलीस पाटील दादासाहेब मुरटे, अंगणवाडी सेविका उत्तमबाई मुरटे, विजया भांडेकर, संगीता माडजे, प्रियांका धनेराव आदींच्या सह्या आहेत.