लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री. बसवेश्वर प्राथमिक व माध्यमिक शाळेत बालाजी अमाईन्स या कंपनीच्या सीएसआर निधीतून बांधण्यात येणाऱ्या भोजन कक्ष व आठ वर्ग खोल्याचे नूतनीकरणाचा शुभारंभ मंगळवारी (दि.१६) कंपनीचे सीएसआर विभागप्रमुख मल्लिनाथ बिराजदार यांच्या हस्ते पार पडले.
तालुक्यातील जेवळी येथील श्री. बसवेश्वर विद्यालय ही स्वातंत्र्यपूर्व १९३७ ला सुरुवात झालेली शाळा आहे. या शाळेचे अनेक विद्यार्थी देशात, परदेशात विविध पदावर कार्यरत आहेत. आताही श्री बसवेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात परिसरातील जवळपास दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेची इमारत दगडी बांधकामाची असून कालानुरूप जीर्ण होण्याबरोबरच १९९३ च्या भूकंपात या शाळेच्या इमारतीला तडे गेल्याने इमारतीची दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यात इमारतीला ठिकठिकाणी गळती लागते. भीतीने अनेक वर्ग बाहेर मैदानात घ्यावे लागत आहे. शाळा प्रशासनाने बालाजी अमाईन्स या केमिकल कंपनीच्या प्रशासनाला भेट घेऊन दुरुस्तीची मागणी केली. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी तसेच संचालक मंडळाने संमती देत कंपनीच्या सी.एस.आर. निधी अंतर्गत विद्यालयात अदयावत भोजनकक्ष व पाकगृह तसेच जीर्ण झालेले व वापराविना असलेले आठ खोल्याची इमारतीचे नूतनीकरण करून देण्याचे निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी (दि.१६) येथील श्री बसवेश्वर प्राथमिक व माध्यमिक शाळेत बांधण्यात येणाऱ्या या भोजन कक्ष व आठ वर्ग खोल्याचे नूतनीकरणाचा शुभारंभ बालाजी अमाईन्सच्या सीएसआर विभागप्रमुख मल्लिनाथ बिराजदार यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी सीएसआर विभागाचे सहाय्यक दत्तप्रसाद सांजेकर, जेवळी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक भुसणे, सचिव ॲड. प्रदिप पणुरे, सहसचिव प्रा. बसवराज पणुरे, बालाजी अमाईन्सचे बसवराज अंट्ट, प्रदीप कोंडले, गणेश नकाते, संचालक एम.एस. गोसावी, ए. पी. शिंदे, आप्पासाहेब हावळे, प्राचार्य एम. सी. चौधरी, मुख्याध्यापक वाय.एस. कांबळे आदींची उपस्थिती होती.