लोहारा (Lohara) तालुक्यातील धानुरी गावाजवळ देवबेट देवीचे मंदिर devbet devi temple) आहे. देवबेट देवीची ओळख तुळजाभवानीचे (tuljabhavani) उपपीठ म्हणून आहे. या ठिकाणी दरवर्षी पारंपरिक पध्दतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. घटस्थापनेपासून ते पौर्णिमेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. याठिकाणी विजयादशमी दिवशी मोठी यात्रा भरते. सध्या येथे विविध धार्मिक कार्यक्रम होत असून या ठिकाणी भावीकांची मोठी गर्दी होत आहे.
तालुक्यातील धानुरी येथील देवबेट देवीचे मंदिर हे समुद्रसपाटीपासून ऊंचीवर आहे. बालाघाट डोंगर रांगेतील हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. देवबेट टेकडीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हे मंदिर धानुरी, जेवळी, हिप्परगा (सय्यद), माळेगाव, हराळी या पाच गावच्या सिमेवर आहे. देवबेट देवीचे मंदिर या परिसरात प्रती तुळजापूर म्हणून ओळखले जाते. पूर्वी येथे दगडी बांधकामाचे पुरातन देवी मंदिर होते. १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपात या मंदीराला तडे गेल्याने धानुरी ग्रामस्थानी मंदीराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगे व मंदीर समितीचे अध्यक्ष राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धानुरी व परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने २००६ मध्ये मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या मंदिराला तीर्थ क्षेत्राचा ‘ड’ दर्जा मिळाला आहे.
धानुरी येथील देवबेट देवीचे मंदिर हे परिसरातील नागरिकांचे श्रद्धेचे ठिकाण आहे. या ठिकाणी दरवर्षी घटस्थापनेपासून पौर्णिमेपर्यंत देविच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. दरवर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर येथे मोठी यात्रा भरते. या मंदिरात धानुरी येथील पुरी कुटुंबीय नित्यनेमाने दररोज सकाळी व संध्याकाळी देवीची पूजा व आरती करतात. दि.३ ऑक्टोबरला घटस्थापना झाल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.