लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात शनिवारी (दि.१९) मोफत दिव्यांग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरास सुरुवात झाली. शिबिराच्या पहिल्याच दिवशी २१५ बालकांची तपासणी करून ३५ बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
तालुक्यातील सास्तुर येथे मागील १६ वर्षांपासून स्पर्श रुग्णालय व निवासी अपंग शाळा सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. जॉय पाटणकर स्मृती निमित्त रोटरी क्लब कॉव्हेट्री लंडन, रोटरी क्लब अंबरनाथ, देवनार, चेंबूर, परिचारक फौंडेशन पंढरपूर यांच्या वतीने १४ वर्षाखालील दिव्यांग (अपंगत्व) असलेल्या बालकांसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात येते. शनिवारी (दि.१९) या शिबिराची सुरुवात झाली. शिबिराच्या पहिल्या दिवशी २१० बालकांची तपासणी करून त्यापैकी ३५ गरजू बालकांच्या टेन्डन लेन्द्निग, सीटीईव्ही प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. रविवारी (दि.२०) देखील दिव्यांग बालकांची तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. अस्थिरोग तज्ञ डॉ. मयुरेश वारके, डॉ. हिमांशू बेद्रे, तर भूलतज्ञ डॉ. प्रमोद काळे तसेच पंढरपूर परिचारक फौंडेशनचे राहुल पटवर्धन, डॉ. राहुल सरदार, डॉ. रोहन मेहता, डॉ. सागर धडस, डॉ. जिज्ञासा पाटील, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, सर्व डॉक्टर्स व कर्मचारी, निवासी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे व सर्व कर्मचारी, लातूर येथील फिजीओ थेरपिस्ट डॉ. मंगेश कुलकर्णी यांनी यावेळी विशेष परिश्रम घेतले. रविवारीही हे शिबीर चालू राहणार आहे. तरी गरजू बालकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी व निवासी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांनी केले आहे.
दिव्यांग शिबिरामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला…
मी उजव्या पायाने दिव्यांग होतो. माझ्या वयाची मुले खेळायची, जोरात पळायची. तेव्हा मला आपण पळू शकत नसल्याबद्दल खूप वाईट वाटायचे. २०१९ साली सास्तूरच्या स्पर्श ग्रामीण रुग्णालयातील दिव्यांग शस्त्रक्रिया शिबिराबद्दल पेपर मध्ये बातमी वाचली व सास्तूर येथे येऊन माझी उजव्या पायाची शस्त्रक्रिया डॉ. जॉन क्लेग व डॉ. मयुरेश वारके यांनी केली. या शस्त्रक्रियेमुळे मी आज चालू, फिरू, पळू शकतो. धावण्याच्या स्पर्धेत मी बक्षीस देखील पटकावले. मला समाजाच्या प्रवाहात आणल्याबद्दल लंडन, मुंबईचे सर्व डॉक्टर्स, दिव्यांग शाळा सास्तूर व स्पर्श रुग्णालय सास्तुरचा मी आभारी आहे.
श्रेयश नरसिंग कळसे,
तोगरी, ता.उदगीर