कोणतेही सामाजिक कार्य करत असताना विरोध होत असतो. अशा कार्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु अशा गोष्टींना न डगमगता गाव आदर्श करण्यासाठी सर्वांनी एक झालं पाहिजे असे आवाहन भास्कर पेरे पाटील (Bhaskar Pere Patil) यांनी केले.
लोहारा (Lohara) तालुक्यातील होळी येथे शनिवारी (दि.३०) व्यसनमुक्तीतून प्रगतीकडे, प्रगतीतून विकासाकडे ‘एकच ध्यास गावचा सर्वांगीण विकास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत होळी व ग्रामपूरस्कृत लोककल्याण कृती समिती होळी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होळीच्या सरपंच सरोजा बिराजदार या होत्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, लोहाऱ्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांची प्रमुख उपस्थिती होती. मागील अनेक दिवसांपासून होळी गावात लोककल्याण कृती समितीच्या माध्यमातून गावामध्ये व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न केला जात आहेत. तसेच समितीच्या माध्यमातून गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन गाव सुधारण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम गावात घेतले पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे मार्गदर्शन गावामध्ये होण्यासाठी लोककल्याण कृती समिती व ग्रामपंचायतच्या संयुक्त प्रयत्नाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पुढे बोलताना भास्कर पेरे पाटील यांनी आदर्श गाव पाटोदा कस बनलं या बाबतीत गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते पुढे बोलताना म्हणाले की, सक्षम महिलांशिवाय गावचा विकास शक्य नाही. महिलांनी सक्षम बनुन समोर आले पाहिजे. पाटोदा गावात महिलांनाच प्रत्येक कामात प्राधान्य दिल्यामुळे आदर्श गाव होण्यास मदत झाली. तसेच गावातील सरपंच व ग्रामसेवकांना गाव हितासाठी, गावचा विकास करुन घेण्यासाठी मदत केली पाहिजे व तशाच पद्धतीने सरपंच व ग्रामसेवकांनी गावहिताचा विचार केला पाहिजे असे ते म्हणाले. तसेच कोणतेही सामाजिक कार्य करत असताना विरोध होत असतो. अशा कार्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु अशा गोष्टींना न डगमगता गाव आदर्श करण्यासाठी सर्वांनी एक झालं पाहिजे असे आवाहन भास्कर पेरे पाटलांनी केले. तसेच नागरिकांना एखादी गोष्ट करु नका म्हणण्यापेक्षा त्यांना त्या गोष्टी बाबतीत पर्याय मिळवुन द्या असेही आवाहन पेरे पाटलांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे मुख्य समन्वयक डॉ. बी. आर. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जी. डी. जाधव यांनी तर करण बाबळसुरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी होळी गावातील महिला, नागरिकांसह परिसरातील गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोककल्याण कृती समितीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी परिश्रम केले.