भाऊसाहेब फुंडकर कृषी योजनेतील फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्याचे अनुदान त्वरित देण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार यांनी सोमवारी (दि. २) लोहारा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. यात म्हणले आहे की, शासनाने सुरू केलेल्या महाडीबीटी या वेबसाईटवरून लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्दसह अनेक गावातील शेतकरी भाऊसाहेब फुंडकर योजनेतून फळबाग लागवड केले आहेत. कृषी विभागाकडून स्थळ पाहणी पंचनामा सह आदी प्रक्रिया झाली आहे. परंतु शेतकऱ्यांना अनुदान अद्याप मिळाले नाही. या योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवडसाठी संमती प्राप्त झाल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने फळबाग लागवड केली आहे. फळबाग लागवडीनंतर प्रत्यक्षात कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहणी देखील झाली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी सुरुवातीला स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करून रोपे खरेदी करून फळबाग लागवड करावी लागते. त्यानंतर रोपे खरेदी केलेली पावती सह आदी खर्चाचा तपशील ऑनलाइन प्रणालीने महाडीबीटी वेबसाईटवर अपलोड करावा लागतो. त्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहणी अहवाल ऑनलाइन सादर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांनी रोपांची खरेदी प्रसंगी दिलेली रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर शासनाकडून जमा केली जात होती. परंतु गेल्या अनेक महिन्यापासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन या पिकाला अधिक भाव नसल्याने व खर्च जास्त तर उत्पन्न कमी होतं असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळ लागवडीकडे अनेक शेतकरी वळले गेले आहेत. उधार, कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांनी फळ लागवड केली आहे. परंतु गेल्या अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांचे फळबाग लागवड योजनेतील रक्कम त्यांच्या खात्यावर पडली नसल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात अडकत चालला आहे. शासनाने तालुक्यातील भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतील शेतकरी लाभार्थ्यांना तात्काळ त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितार्थ तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार, तालुका कार्याध्यक्ष किरण सोनकांबळे, अभिजीत सूर्यवंशी, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष खंडू शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.