आम्ही तुमच्यासोबत होतो पण तुम्ही आमचा विश्वासघात करून आम्हाला काँग्रेसच्यासोबत जायला भाग पाडल असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली.
उमरगा – लोहारा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ लोहारा शहरात मंगळवारी (दि.१२) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेत ते बोलत होते. लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या सभेसाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महाविकास आघाडीचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रवीण स्वामी, धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक जवळगे, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी आणि शहा आपल्यामध्ये आणि गुजरात मध्ये भिंत बांधताहेत. महाराष्ट्रामध्ये मागील अनेक वर्षांपासून गुजराती माता, भगिनी बांधव आनंदाने राहताहेत. तुम्ही का आमच्या सुखामध्ये मीठ कालवताय असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर टीका केली. आम्ही तुमच्यासोबत होतो पण तुम्ही आम्हाला विश्वासघात करून काँग्रेसच्या सोबत जायला भाग पाडल. आम्ही काँग्रेसच्या सोबत गेलो म्हणून तुमच्या पोटात गोळा येत असेल तर तुम्ही ज्या काश्मीरची आठवण करून दिली, त्याच काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती आणि मुफ्ती महंमद सईद बरोबर जेंव्हा बसला होता तेंव्हा काय झालं होतं तुमच्या हिंदुत्वाच? असा सवाल केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योग धंदे परराज्यात गेले, सोयाबीनच्या दर आदी मुद्यावरून टीका केली. मी महाराष्ट्रासाठी लढतोय, कोणाला काही वाटत असेल की उद्धव ठाकरेला पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय. अजिबात तसं काही वेड माझ्या डोक्यात नाही. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचे उद्घाटन घाईगडबडीत का केले यावरही टीका केली. मोदी गॅरंटी की ठाकरे गॅरंटी हे आता तुम्हाला ठरवायचं आहे हे सांगत त्यांनी त्यांचा जाहीरनामा वाचून दाखवला. यात पुन्हा एकदा कर्जमाफी करणार, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार, मुलांनाही मोफत शिक्षण देणार आदीचा समावेश होता.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उमेदवार प्रवीण स्वामी, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, अनिल जगताप, ऍड. शितल चव्हाण, सयाजी शिंदे, सुधाकर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. या सभेसाठी लोहारा – उमरगा मतदारसंघातील नागरिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.