देशात लागू झालेल्या नवीन तीन कायद्याविषयी माहिती मिळावी यासाठी लोहारा शहरातील हायस्कुल व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी लोहारा पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.१) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दि. १ जुलै २०२४ पासून देशात तीन नविन कायदे लागू झाले आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष संहिता हे तीन नवे कायदे गेल्या डिसेंबरमध्ये संसदेमध्ये संमत करण्यात आले होते. हे तीन कायदे भारतीय दंड संहिता १८६०, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ आणि भारतीय साक्षीपुरावा अधिनियम१८७२ या कायद्याऐवजी लागू होणार आहेत. याबाबत माहिती मिळावी म्हणून लोहारा पोलीस स्टेशनच्या वतीने लोहारा शहरातील हायस्कूल लोहारा, भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र बोस व शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती मिळावी यासाठी लोहारा पोलीस स्टेशन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक अजित चिंतले, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.के. नरवडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे, पोलीस नाईक निरंजन फुलमाळी आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वैजनाथ पाटील, विनोद तुंगे, प्रा. माने, पवार मॅडम, शिवाजी माने, परमेश्वर कांबळे, महेश खोत, शिवाजी जाधव, शिंदे सर, सुनील बहिरे आदीसह शिक्षक, विद्यार्थी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
